पदवीधर निवडणुकीसाठी नगर जिह्यात सर्वाधिक 147 मतदान केंद्रे

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 30) मतदान होत आहे. नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिह्यांचा मतदारसंघात समावेश आहे. निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नगर जिह्यात सर्वाधिक 147 मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले असून, महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील आणि अपक्ष सत्यजित तांबे यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

नगर जिह्यात सर्वाधिक 1 लाख 15 हजार 638 इतके मतदार असून, नाशिक जिह्यात 69 हजार 652 मतदार आहेत. त्याखालोखाल जळगाव जिह्यात 35 हजार 58 मतदार असून, धुळे जिह्यात 23 हजार 412, तर नंदुरबार जिह्यात 18 हजार 971 मतदार आहेत. नगर जिह्यात सर्वाधिक मतदार असल्याने नगर जिल्हा किंगमेकर ठरणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 2 लाख 62 हजार 771 मतदार आहेत. त्यासाठी 338 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगर जिह्यात सर्वाधिक 147 मतदान केंद्रे आहेत. यामध्ये अकोले 10, संगमनेर 28, राहाता 15, कोपरगाव 8, राहुरी 10, नेवासा 10, नगर शहर व तालुका 16, पाथर्डी 7, शेवगाव 7, पारनेर 8, श्रीगोंदा 9, कर्जत 6, जामखेड 5 यांचा समावेश आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गेल्या 15 दिवसांपासून चांगलीच गाजली आहे. काँग्रेसमध्ये डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीवरून चांगलाच अंतर्गत कलह पाहायला मिळाला. डॉ. तांबे यांचा मुलगा व आमदार बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे यांनी शेवटच्या क्षणी अपक्ष अर्ज भरल्यामुळे काँग्रेससह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दुसरीकडे भाजपने या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही आणि अद्यापि कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे.