
पश्चिम रेल्वेच्या धिम्या मार्गावरील अंधेरी आणि विरारदरम्यान पंधरा डब्यांची लोकल चालविण्यास लांबलेल्या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे नव्या वर्षांच्या सुरुवातीला स्लो कॉरिडॉरवर प्रथम पंधरा डब्याचा प्रयोग आता मार्चपर्यंत लांबणार आहे.
पश्चिम रेल्वेवर अंधेरीच्या पुढे विरारपर्यंत लोकल गाडय़ांमध्ये मुंगी शिरायलाही जागा नसते. परंतु पश्चिम रेल्वेने पंधरा डब्यांच्या पाच लोकलच्या 54 फेऱ्या चालवून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या सर्व फेऱ्या चर्चगेट ते विरारदरम्यान केवळ जलद मार्गावर चालविण्यात येतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेने अंधेरीच्या पुढे विरारपर्यंत धिम्या मार्गावर प्रथमच पंधरा डबा लोकल चालविण्याची योजना आखली आहे. त्यासाठी 59.53 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. त्यापैकी गेल्या अर्थसंकल्पात 12 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. अंधेरीपासून विरारपर्यंतच्या सर्व धिम्या मार्गावरील फलाटांची लांबी वाढविण्याचे काम 60 टक्क्यांपर्यंत झाले होते. यात ट्रॅकचे सिग्नल बदलणे, फलाटावरील पायाभूत सुविधा उभारण्याचे काम डिसेंबरपर्यंत जानेवारीत पहिला धिम्या मार्गाचा पंधरा डबा धावणार होता. परंतु ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसाने कामे अपूर्ण राहिल्याने आता मार्चपर्यंत हा प्रयोग लांबला आहे.
धिम्या मार्गावरील पंधरा डब्यांच्या प्रकल्पाचे जोगेश्वरी आणि इतर स्थानकांचे काम अपूर्ण असून मार्चपर्यंत ही कामे होतील. त्यानंतर पंधरा डब्याच्या वीस फेऱ्या वाढविणे शक्य होईल. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यास 30 हून अधिक पंधरा डब्याच्या फेऱ्या चालविणे शक्य होणार असल्याने अंधेरीच्या पुढील प्रवाशांना याचा फायदा होऊन गर्दी कमी होण्यास मदत होईल असे पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.



























































