
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत (एनएमएमटी) १५० नवीन बसेस लवकरच दाखल होणार आहेत. ही बसेस खरेदी करताना महापालिका प्रशासनाने इलेक्ट्रिक ऐवजी सीएनजी बसेसला प्राधान्य दिले आहे. इतक्या मोठ्या संख्येने बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात सहभागी होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एनएमएमटीच्या माध्यमातून नवी मुंबईसह पनवेल, उरण, खोपोली, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड, भाईंदर आदी ठिकाणी बस सेवा चालवली जाते. एमएमआरडीए क्षेत्रातील परिवहन सेवेचा मोठा भार एनएमएमटीने उचला आहे. एनएमएमटीमध्ये सध्या सुमारे ३०० इलेक्ट्रिक बसेस चालतात. मात्र त्यापैकी काही बसेस वारंवार नादुरुस्त होतात. त्याचा परिणाम फेऱ्यांवर होत आहे. त्यामुळे एनएमएमटी प्रशासनाने १५० नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एनएमएमटीच्या बळकटीकरणासाठी मागील अर्थसंकल्पात ठोस अशी आर्थिक तरतूद केली होती. या अर्थसंकल्पात आयुक्तांनी नव्या बस खरेदीचा प्रस्तावही मांडला होता. एनएमएमटीच्या ताफ्यात प्रशिक्षित वाहक चालकांची पुरेशी संख्या आहे. त्यामुळे भाडेपट्ट्यावर बस चालवण्याऐवजी नव्या गाड्या खरेदी करून उपलब्ध कर्मचाऱ्यांसह त्या वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे.
नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उरण-पनवेल, खोपोली, मुंबई अशा वेगवेगळ्या ७५ मार्गांवर एनएमएमटीच्या बस सेवेत आहेत. सीएनजीवरील नव्या १५० बसेस याच मार्गावर चालवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
महिनाभरात नवीन बसेसची सेवा सुरू होणार
नवीन येणाऱ्या दीडशे बसेसमुळे एनएमएमटीमधील एकूण बसेसची संख्या वाढणार असली तरी नवीन बसमार्ग सुरू करण्यात येणार आहेत. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या बसमार्गावरच या बसेस चालवण्यात येणार आहेत. कोणत्या मार्गावर या बसेस चालवयाच्या याचा प्रस्तावही तयार केला जात आहे. महिनाभरात या नवीन बसेसची सेवा सुरू होणार आहे, असे एनएमएमटीचे महाव्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी सांगितले.
































































