साईबाबांच्या चरणी दिल्लीश्वरांची संख्या वाढली, विमानसेवा विस्तारण्याची सरकारची योजना

110

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘सबका मालिका एक…’ अशी ख्याती असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी दिल्लीश्वरांच्या फेर्‍या वाढल्या आहेत. शिर्डी विमानतळ देशातील इतर विमानतळांशी जोडल्यानंतर आता दिल्लीखालोखाल बंगळुरू, चेन्नई व इतर राज्यांतील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आसपासच्या राज्यांतून दररोज शिर्डीला विमानाने सरासरी 17 हजार प्रवासी येतात. विमानाने शिर्डीला येणार्‍या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिर्डीच्या विमानसेवेचा विस्तार इंदूर, कोइंबतूरपर्यंत करण्याची योजना महाराष्ट्र सरकारने आखली आहे.

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून ‘उडाण’ योजनेअंतर्गत महाराष्ट्राचा ग्रामीण भाग विमानसेवेने जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवडय़ात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत राज्यातील विमानसेवेचा आढावा घेण्यात आला. अमरावतीमधील वरोरी, पुरंदर, सोलापूर, चंद्रपूर हे जिल्हे विमानसेवेने जोडण्यात येणार आहेत. या कामाच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. अमरावती विमानतळाचे काम वेगाने सुरू झाले आहे. त्यावर इतर सर्व विमानतळांच्या इमारतींचे व धावपट्टीचे काम वेगाने सुरू करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिर्डीतील विमानसेवेचा आढावा घेतला. शिर्डीतील विमानतळाचे उद्घाटन 1 ऑक्टोबर 2017 रोजी झाले. तेव्हापासून या विमानसेवेचा प्रतिसाद वाढत असल्याची आकडेवारी या बैठकीत सादर करण्यात आली. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी रस्ते, बस,  मोटारीमधून दररोज सरासरी एक लाख भाविक येतात. त्यात गुरुवार, शनिवार व सुट्टीच्या दिवशी येणार्‍या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. कमीत कमी वेळेत शिर्डीला पोहोचण्यासाठी विमानसेवेचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे विमानसेवेची मागणी वाढली.

मिहानला चालना

नागपूरमधील मिहान स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी उपकरणे तयार करणार्‍या डायनॅमिक्स कंपनीला 27 एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. मिहानमध्ये उत्पादन सुरू करण्यासाठी आणखीन काही कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. या बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आदी उपस्थित होते.

17 हजार भाविक

शिर्डी विमानतळावर दररोज वेगवेगळय़ा राज्यांतून 17  विमाने येतात. त्यात प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, भोपाळ, हैदराबाद, बंगळुरूमधील भाविकांची संख्या अधिक आहे. या राज्यातून दररोज सरासरी 17 हजार भाविक शिर्डीत येतात अशी आकडेवारी या बैठकीत मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

विमानसेवेचा विस्तार

शिर्डी विमानसेवेची मागणी वाढत आहे. त्यामुळे इंदूर, काइंबतूर आदी शहरांमध्ये विमानसेवा वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. त्यामुळे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून शिर्डीतील विमानसेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या