
सामना ऑनलाईन । मुझफ्फरपूर
उत्तर प्रदेशच्या रतनपुरी भागात एका तबेल्यात दरोडेखोर्यांनी हल्ला करत तिथल्या 18 म्हशी पळवल्या. 18 म्हशींसह दरोडेखोरांनी तबेला मालकाचा फोन आणि दुचाकीही पळवली. म्हशींची किंमत 15 लाख असल्याचे तबेला मालकाने सांगितले. या बाबत जेव्हा पोलिसांकडे फोनवरून तक्रार केली तेव्हा पोलीस तब्बल दोन तासांनंतर घटनास्थळी दाखल झाली त्यामुळे रागावलेल्या नागरिकांनी पोलिसांविरोधातच आंदोलन केले.
मुझफ्फरपूरच्या राढधान मार्गावार माजी सरपंच नरेश पाल यांचा तबेला असून त्यांचा दुग्धव्यवसाय आहे. गुरूवारी रात्री 25 ते 30 दरोडेखोरांनी पाल यांच्यावर हल्ला केला. बंदुकी दाखवून त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर तबेल्यातल्या 18 म्हशी, पाल यांचा मोबाईल आणि दुचाकी पळवली. दरोडेखोर पळून गेल्यावर पाल आणि त्यांच्या सहकर्मीने स्वतःची कशीबशी सुटका केली आणि पोलिसांना फोनवरून याबाबत माहिती दिली.
तबेल्यापासून पोलीस स्थानक फक्त 500 मीटर अंतरावर असूनही पोलीसांना यायला दोन तास लागले. स्थानिक नागरिकांनी चिडून पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. शेवटी पोलिसांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन थांबवले.

























































