अकोल्यात आढळले कोरोनाचे 18 रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू

692

अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग काही केल्या नियंत्रणात येत नसून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. बुधवारी आणखी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मंगळवारी  रात्री एका कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 186 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा मृतांचा आकडा 14 वर पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मंगळवारी रात्री 41 जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोल्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृतकांच्या संख्येतही भर पडत आहे.

बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून एकूण 120 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर उर्वरित 102 अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या 18 रुग्णात नऊ महिला व नऊ पुरुष आहेत.

सोमवारी दाखल करण्यात आलेल्या न्यू भीमनगर भागातील 62 वर्षीय महिलेचा मंगळवार, 12 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींचा आकडा 14 झाला आहे. जिल्ह्यात 15 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी 14 जण कोविड-19 आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.

60 जण कोरोनामुक्त

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 60 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी 5 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर रात्री आणखी 41 जणांना सुटी देण्यात आली.  त्यापूर्वी 14 जण कोरोनामुक्त झाले होते. आतापर्यंत जिल्ह्यातील 60 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या