उत्तर प्रदेशातील हाथरस येथे स्वातंत्र्य दिनी दुख:द घटना घडली आहे. दुकानाच्या छतावर झेंडा लावण्यासाठी चढलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा करुण अंत झाला आहे. दुकानावरून जाणाऱ्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
हाथरस मधील सिंकदराराऊ येथे मृत तरुण सुहेल याचे दुकान आहे. या दुकानावरून हाय-व्होल्टेज वीज वाहिनी जाते. स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाअंतर्गत दिलेला झेंडा लावण्यासाठी म्हणून तो दुकानाच्या छतावर चढला होता. मात्र विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याला करंट लागला. करंट लागताच सुहेल छतावरून खाली कोसळला.
सुहेल छतावरून खाली कोसळताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने जवळच्या रूग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारांपूर्वीच रूग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरूण मुलगा गेल्याने कुटुंबीयांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंकदराराऊ मधील खिजरगंजच्या नगर पालिकेजवळ सुहेलचे दुकान आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाला प्रेरित होऊन सुहेल देखील आपल्या दुकानावर झेंडा लावण्यासाठी चढला होता. विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याचा मृत्यू झाला. सुहेलच्या घरच्यांनी नगर पालिकेला या घटनेसाठी जबाबदार धरले आहे. नगर पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे आम्ही आमचा मुलगा गमावला असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हाथरस येथे विजेच्या खांबामध्ये करंट उतरला होता. त्याच्या संपर्कात आल्याने एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा विजेचा करंट लागून जीव गमावल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.