राज्‍यातील 192 पतसंस्‍थेचे 700 कोटी देणं बाकी- सहकार आयुक्‍त सतीश सोनी 

159

सामना प्रतिनिधी । कोपरगाव 

राज्यात 31 हजार ग्रामीण, नागरी आणि पगारदार पतसंस्था असून त्यांच्या सभासदांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या संस्थांवरील संचालक मंडळ मनमानी करत अनेकांना मर्यादेपेक्षा जास्त कर्ज वाटप करतात. तसेच वाढीव व्याजदराने ठेवी स्वीकारणे या कारभारामुळे संबंधित संस्थांचे आर्थिक गणित बिघडत आहे.  यामुळे 469 पतसंस्था अडचणीत आल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या 1820 कोटी ठेवींपैकी 1100 ठेवी वसुल करण्यात आल्‍या असून आजमितीला 192 पतसंस्‍थाच्‍या 700 देणं बाकी असल्‍याची माहिती सहकार आयुक्‍त व निबंधक सहकारी संस्‍था, पुणे  सतीश सोनी यांनी शनिवारी दिली.ते कोपरगाव येथील समता  पतसंस्‍था सभागृहातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

आयुक्‍त सोनी यांच्‍या हस्‍ते समता पतसंस्‍थेच्‍या व्हाऊचर लेस ॲपचे उद्‌घाटन केले. सोनी म्‍हणाले, “शिर्डी येथील संवाद मेळाव्‍यात झालेल्‍या चर्चेत ज्‍या काही योजना सादर केल्‍या. त्‍या अजूनपर्यंत का झाल्या नाहीत? याचे मला आश्चर्य वाटते.” मी मात्र त्‍यात दुरूस्‍त्‍या करून पुढे पाठविणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आम्‍हाला पतसंस्‍थांची संख्यात्‍मक नव्‍हे तर गुणात्‍मक वाढ हवी, सहकारी पतसंस्थांच्या संचालक मंडळाचा मनामानी कारभार दिवसेंदिवस वाढत चालल्याने संबंधित संस्था आर्थिक अडचणीत येत आहेत. याचा भुर्दंड सभासदांबरोबरच ठेवीदारांना बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पतसंस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने  ठेवी संरक्षण, नियामक मंडळ, वसुली,  कर्जदाराने कुठल्‍या पतसंस्‍थेत कर्ज घेतले याची माहिती देणारे सॉप्‍टवेअर तसेच प्रभावी संवाद या पंचसूत्रीच्‍या आधारे दीड कोटी ठेवीदारांच्‍या ठेवीचे संरक्षण करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

समता पतसंस्‍थेबद्दल बोलताना आयुक्‍त सतीश सोनी म्हणाले, आज एक आदर्श पतसंस्‍था बघितली. समताच्‍या कारभाराचे अनुकरण आयुक्‍त कार्यालयाने केले पाहिजे. यावेळी विभागीय सहानिबंधक, सहकारी संस्‍था नाशिक, आर.सी शहा, जिल्‍हा उपनिबंधक अहमदनगर दिग्‍विजय आहेर, नासिक जिल्‍हा उपनिबंधक गौतम बलसाणे आदी आधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या