
देवरुख शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे. शहरात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ते दोघे स्थानिक आहेत. शनिवारी तालुक्यातील एकूण 21 जणांचे स्वॅब तपासणीसाठी जिल्हा कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. यातील तब्बल 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये देवरुख- दत्तनगर, देवरुख – कांजिवरा, साडवली, कुडवली, भडकंबा येथील रुग्णांचा समावेश आहे.
देवरुखमधे यापूर्वी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आरोग्य कर्मचारी होता. त्याची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह होती. हे दोन रुग्ण उपचारानंतर बरे होवून घरी परतले होते. त्यानंतर गेले 2 महिने शहरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. मात्र कालच्या अहवालात दोन नवे पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोनही रुग्ण स्थानिक रहिवासी आहेत. यातील एक रुग्ण एसटी महामंडळातील कर्मचारी असून दुसरी व्यक्ती साडवली येथील एका फॅक्टरीत काम करणारी आहे. या फॅक्टरीतील 2 जण यापूर्वीच पॉझिटिव्ह सापडले आहेत. साडवलीत सापडलेला रुग्णही वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असून या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांची आता तपासणी केली जाणार आहे. रुग्ण सापडलेले परिसर सिल केले जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी आता तालुक्यात चाकरमानी येत आहेत. अशा स्थितीत स्थानिक पातळीवर पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने आगामी काळात ही संख्या वाढण्याची चिन्ह आहेत.

























































