साकीनाक्याच्या आगीत दोघांचा मृत्यू, इलेक्ट्रिक, हार्डवेअरचे दुकान जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पूर्व साकीनाका येथे इलेक्ट्रिक, हार्डवेअरच्या दुकानाला रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन तरुणांचा होरपळल्याने मृत्यू झाला, तर दुकानातील सामान जळून खाक झाले.

साकीनाका मेट्रो रेल्वे स्थानक परिसरात हे दुकान आहे. या ठिकाणी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास आग लागली. दुकानातील इलेक्ट्रिक व हार्डवेअर सामानाचा मोठा साठा, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे यामुळे आग वेगाने भडकली. यावेळी काही कामगार दुकानात झोपले होते. आग लागल्याचे समजताच त्यांनी दुकानाबाहेर धाव घेतल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र दोघे जण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, या आगीच्या घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत असलेले राकेश गुप्ता (22), गणेश देवशी (23) यांना जवळच्याच राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 फायर इंजिन व 7 जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने सदर आगीवर 8 तासांच्या अथक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवून आग विझविली. ही आग का, कशी लागली? याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी अधिक तपास करीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.