
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
दरमहा शिक्षकांच्या पगारातून कपात होणाऱ्या भविष्य निर्वाह निधीचा जमाखर्च दर्शवणाऱ्या स्लिपचे आज शुक्रवारी तालुकानिहाय वाटप करण्यात आले. दर महिन्याला २० हजारांची कपात केलेली असताना १० हजारच दाखविण्यात आल्याचे लक्षात येताच शिक्षक गोंधळून गेले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पगारातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीचे २० हजार रुपये कपात केले जातात. या कपातीच्या स्लिपचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, दिनकर पाटील, साधना बांगर व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन हे काम पूर्ण केले. काही शिक्षकांच्या स्लिपमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. २० हजार मासिक कपात असताना फक्त १० हजारांची कपात झाल्याचे दिसून आल्याने शिक्षक अवाक् झाले. २० हजारांची कपात असताना १० हजार आले कसे असा सवाल अनेक शिक्षक करीत होते.
अर्ध्यावर रक्कम गायब झाल्यामुळे शिक्षक धास्तावले असून, ही त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे. दरम्यान, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, संतोष ताठे, सुनील चिपाटे, महेंद्र बारवाल, रमेश जाधव, राजेश भुसारी, किशोर कदम, दत्तात्रय गायकवाड, शरद शहापूरकर, मच्छिंद्र शिंदे, मच्छिंद्र भराडे, विनोद पवार, नजीर पठाण आदींनी दीपावलीच्या तोंडावर स्लिपचे वाटप झाल्यामुळे प्रशासनाचे आभार मानले आहेत.





























































