निधीअभावी राज्यातील 200 नव्या आरोग्य केंद्रांना टाळे; आवश्यक उपकरणांसाठी पैसे नाहीत, कर्मचारीही नाहीत

राज्यभरात बांधण्यात आलेली 200 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे निधीअभावी बंद आहेत. या आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणे, औषधे पैसे नाहीत तसेच कर्मचाऱ्यांचीही भरती करण्यात आलेली नाही, अशी धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.  त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरीबांना उपचाराअभावी जीव गमवावा लागण्याची शक्यता असून जनतेत राज्य सरकारविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे ही अत्यंत महत्त्वाची आरोग्य यंत्रणा आहे. वैद्यकीय आणीबाणीप्रसंगी किंवा गावांमध्ये एखाद्या आजाराचा उद्रेक झाला तर याच आरोग्य केंद्रांमध्ये जाणे गोरगरीब रुग्णांना परवडते. या ठिकाणी गोरगरीबांना उत्तम उपचार मिळतात. याच आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध आरोग्य मोहिमा राबवण्यात येत असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जनजागृती तसेच महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे काम या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून होते, परंतु या आरोग्य केंद्रांसाठी राज्य सरकारकडे निधीच नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पूर्णपणे बांधून तयार केंद्रे दोन वर्षांपासून पडून

मंजूर आरोग्य केंद्रांपैकी पूर्णपणे बांधून तयार असलेल्या केंद्रांच्या इमारती गेल्या दोन वर्षांपासून पडून असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. या आरोग्य केंद्रांमध्ये पायाभूत सुविधाही नाहीत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या चार वर्षांत 98 प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली होती. त्यातील 64 आरोग्य केंद्रे सुरू आहेत, मात्र 34 आरोग्य केंद्रांना टाळे लागल्याचे अधिकारी म्हणाले.

वीजही नाही आणि कर्मचारीही

प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे गेल्या चार वर्षांपूर्वी बांधण्यात आली, परंतु ती आता बंद आहेत. या केंद्रांना फर्निचर, वीज जोडणीसाठीही निधी देण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाही. त्यामुळे त्यांचीही भरती करण्यात आलेली नाही, असे वास्तवही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभरात 2021 ते 2025 दरम्यान 400 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे उभारण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यापैकी 210 इमारती उभ्या राहिल्या, परंतु त्या सध्या बंद आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.