
सामना ऑनलाईन । मुंबई
अलिबाग व मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर चित्रपटसृष्टीपासून राजकारणी व उद्योगपतींनी सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून बांधलेल्या तब्बल 202 अनधिकृत बंगल्यांवर बुलडोझर फिरणार आहे. आर्थिक घोटाळा करून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीच्या बंगल्याचा यात समावेश आहे. अलिबागमधील मोदीचा अनधिकृत बंगला तातडीने जमीनदोस्त होणार आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज दिली.
न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत बंगल्यांच्या केसेस राष्ट्रीय हरित लवादाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. या बंगल्यांवर कारवाई करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे कदम म्हणाले. यात अलिबागमधील 145 बंगल्यांचा समावेश आहे, पण त्यातील 60 बंगले स्थानिकांचे आहेत तर मुरुडमध्ये 167 बंगले अनधिकृत असून त्यातील 50 बंगले स्थानिकांचे आहेत. केंद्राच्या नियमाप्रमाणे स्थानिक रहिवाशांना त्यातून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बेकायदा बंगले बांधणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल असून त्यांच्या कागदपत्रांची एका महिन्यात पोलिसांमार्फत छाननी होईल. सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृत बंगला असल्यास तो बांधल्याचे सिद्ध झाल्यास पाच वर्षांची कैद व एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल. येत्या दोन-तीन दिवसात कारवाई होईल असे ते म्हणाले.
नीरव मोदीच्या बंगल्यावर कारवाई
नीरव मोदीच्या बंगल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले की, नीरव मोदीने कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला आहे. अलिबागमध्ये त्याचाही बंगला आहे. तो बंगला तातडीने तोडण्याचे आदेश आज दिले आहेत, असे ते म्हणाले.


























































