
2021 संपून 2022 सुरू झाले आहे. नुकतीच ख्रिसमस, नवीन वर्षाची सुट्टी संपली आहे. अनेकांची पुढच्या वर्षाची प्लानिंग देखील सुरू झाली आहे. या वर्षी अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक सुट्ट्या या दोन ते तीन दिवस सलग किंवा जोडून आल्या आहेत. त्यामुळे दोन ते चार दिवस लांब सुट्ट्यांचं नियोजन करायचं असेल तर त्या उपयुक्त ठरणार आहेत. या वर्षी मार्च, एप्रिल, मे, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात सुट्ट्या जोडून आल्या आहेत.

मार्च महिन्यात 18 मार्च शुक्रवारी होळी आली आहे. अनेकांना शनिवारी सुट्टी असते अशांनी 17 मार्च रोजी सुट्टी घेतली तर 17,18,19,20 मार्च अशी सलग सुट्टी मिळणार आहे. ज्यांना शनिवार सुट्टी नाही त्यांनी ती सुट्टी टाकली तर किमान तीन दिवसाची एक छोटी टूर तुम्ही या काळात आटपू शकता.

एप्रिल महिन्यात 14 एप्रिलला गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 एप्रिल रोजी गुड फ्रायडे तर 16 व 17 एप्रिल शनिवार व रविवार आहेत. त्यामुळे सलग चार दिवस आरामात सुट्टी मिळणार आहे.

मे महिन्यात 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. त्यामुळे शनिवार रविवार सुट्टी असणाऱ्यांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सोमवारी आल्याने शनिवार रविवार अशी सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे.

सप्टेंबर महिन्यात अनंत चतुर्दशी ही शनिवार व रविवारला जोडून आल्याने नोकरीवाल्यांना तीन दिवस रजा मिळणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यातही 22 ते 24 दिवाळीची सुट्टी आहे. 22 शनिवार असून त्या दिवशी धनत्रयोदशी आहे. 23 रविवार व 24 ला दिवाळीचा पहिला दिवस आहे. 26 तारखेला पाडवा असल्याने सुट्टी आहे. त्यामुळे फक्त 25 तारखेला सुट्टी टाकली की 22 ते 26 अशी पाच दिवसांची सुट्टी तुम्हाला मिळू शकते.



























































