शिंदे गटाने भिवंडीतून २०८ बोगस मतदार आणले, भाजप-काँग्रेसने दिले पुरावे; पोलिसांचा कसून तपास

जमीन घसरू लागल्याने त्यांनी २०८ बोगस मतदार भिवंडीतून आणल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसने केला आहे. कोहोज गाव परिसरातील एका सभागृहात शेकडो महिला व पुरुष जमले होते. भाजप आणि काँग्रेसच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कोहोज गावात जाऊन या २०८ जणांना ताब्यात घेतले. हे लोक स्थानिक नाहीत बाहेरून आलेले आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावर ते येथे का आले याचा आम्ही तपास करीत आहोत अशी माहिती अंबरनाथ पूर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

निवडणुकीची वेळ संपायला आली की या २०८ बोगस मतदारांना रांगेत घुसवून त्यांच्याकडून बोगस वोटिंग करवून घ्यायचे हा शिंदे गटाचा अॅक्शन प्लॅन असल्याचा आरोप भाजपचे गुलाबराव करंजुले यांनी केला. बुवापाडा येथील काँग्रेसचे उमेदवार प्रकाश पाटील यांनीही शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावर बाहेरून बोगस मतदार आणले आहेत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा अशी मागणी केली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या सर्व महिला, पुरुष आणि मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील आधारकार्डावर भिवंडीचा पत्ता असल्याचे त्यांना आढळले. फिरत्या तपास पथकाकडून त्याचा तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणाची माहिती समोर येईल असे अंबरनाथ पोलिसांनी सांगितले.