आपल्या देशात स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याची युवकांमध्ये क्रेझ आहे. आता त्यासोबतच युवकांनी स्टार्टअपकडे लक्ष केंद्रित करून आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन उद्योजक बनण्याचे स्वप्न अंगीकारावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर होते. या वेळी आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. राजेंद्र वडजे उपस्थित होते. रोहन देशमुख यांनी स्वागत केले.
महोत्सवात 62 महाविद्यालयांमधून 1800 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. चार दिवस चालणाऱया या महोत्सवात 39 कलाप्रकारांचेही सादरीकरण होणार असल्याचे डॉ. केदारनाथ काळवणे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, ‘‘विद्यार्थी कलाकारांनी युवा महोत्सवातील प्रत्येक कलाप्रकारात सहभाग घेऊन आनंद लुटावा. चांगली कला सादर करून टॅलेंट सिद्ध करावे. त्यासोबतच युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक दिवस आत्मपरीक्षण करावे. आपल्या क्षमतेचेही निरीक्षण करावे. संवाद कौशल्यदेखील खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगले संवाद असणे फार महत्त्वाचे असते. उद्योजक बनण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांनी पाहावे,’’ असे आवाहन त्यांनी केले.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले, ‘‘स्पर्धा म्हटले की जय-पराजय येतो. मात्र, सहभाग हाच खरा विजय असतो. 39 कला प्रकारांचा सहभाग असलेला हा युवा महोत्सव युवा विद्यार्थी कलाकारांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.’’