अन् पोलीस होण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले

accident-common-image

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शहरात आलेला २१ वर्षीय तरुण अपघातात ठार झाल्यामुळे त्याच्या स्वप्नाच्या ठिकऱ्या उडाल्या.

धुळे जिल्ह्यातील वायपूर येथे राहणारा २१ वर्षीय राहुल साहेबराव पाटील हा पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून संभाजीनगरात आला. येथे आल्यानंतर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेतला. वाळूज औद्योगिक वसाहतीतील गरुडझेप या अ‍ॅकडमीत प्रवेश घेतला. पोलीस होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून सकाळी आणि सायंकाळी कवायती करून घेतल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून राहुल साहेबराव पाटील २५ जुलै रोजी सकाळी पहाटे चार वाजता वैभव काळे, शाम पंडित, राहुल पाटील, विनोद शिंदे आणि प्रशिक्षण केंद्रातील अन्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसह कवायत करण्यासाठी महावीर चौकातून जाताना भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात राहुल पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी वाळूज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना राहुल पाटील मरण पावला. या अपघाताची नोंद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या