पदवीधर निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 22 हजार 681 मतदार

कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक 26 जून रोजी होत आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 22 हजार 681 मतदारांची नोंदणी झाली असून जिल्ह्यातील 38 मतदान केंद्रावर त्यांचे मतदान होणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. यासाठी आवश्यक प्रशिक्षण निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचार्‍यांना देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी बर्गे, जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. गेल्यावेळी 16 हजारहून अधिक मतदारांची नोंदणी झाली होती. यावेळी राजकीय पक्ष व प्रशासनाकडून वेगवेगळ्या राबवण्यात आलेल्या अभियानामुळे 22 हजार 681 पदवीधर मतदारांची नोंद झाली आहे. विशेषत: शासकीय मतदारांची संख्या मोठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात 38 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर 38 प्रिसायडींग ऑफीसर, 10 रिझर्व्ह ऑफीसर असून 38 मायक्रो ऑर्ब्झरव्हर आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 258 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी यांचाही यात समावेश असल्याचे एम. देवेंदर सिंग यांनी सांगितले. 14 जून रोजी पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून 21 रोजी दुसरे प्रशिक्षण होणार आहे. तिसरे प्रशिक्षण 25 रोजी होणार असून त्याच दिवशी मतदान पेट्यांसह मतदार अधिकारी रवाना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदान झाल्यानंतर राजापूर, लांजा, संगमेश्वर व रत्नागिरीच्या मतपेट्या रत्नागिरीत एकत्र केल्या जाणार आहेत. त्यानंतर या पेट्या चिपळूण येथे जातील. गुहागर व चिपळूणच्या पेट्या घेऊन गाडी बंदोबस्ता पुढे जाईल. मंडणगड, दापोली व खेडच्या पेट्या खेड तहसील कार्यालयात एकत्र केल्या जातील. त्यानंतर या पेट्या रत्नागिरी, चिपळूणच्या पेट्यांसह कोकण भवनला रवाना होणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी आणि मतदान केंद्राच्या शंभर मीटर लाईनवरती एक पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून असणार असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. जवळपास दीडशे कर्मचारी या निवडणुकीसाठी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

कोकण पदवीधर निवडणूक
रत्नागिरी जिल्हा
तालुका                     मतदार           मतदान केंद्र
मंडणगड                    644              1
दापोली                      2,038           4
खेड                         2,168           4
चिपळूण                    4,232            8
गुहागर                      1,657            2
संगमेश्वर                    2,550            5
रत्नागिरी                    6,087            9
लांजा                       1,611            2
राजापूर                    1,694            3
एकूण                     22,681         38