एकाच नाल्यातून काढला 22 टन प्लॅस्टिक कचरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली-मिरज–कुपवाड शहर महापालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग आला आह़े महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिका क्षेत्रात मक्तेदाराकडून युद्धपातळीवर नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. सांगलीतील मोठे समजले जाणारे भोबे गटारातून 22 टन कचरा काढण्यात आला. यामध्ये प्लॅस्टिक बाटल्या व प्लॅस्टिक कचरा मोठय़ा प्रमाणात बाहेर काढण्यात आला आहे. या कामावर उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे.

सांगली महापालिका क्षेत्रात आठ दिवसांपासून नालेसफाई सुरू आहे. याबाबतचा आढावा शनिवारी आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेत घेऊन नालेसफाईसाठी पालक अधिका ऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अंतर्गत पालक अधिका ऱ्यांनी आपापल्या भागामध्ये नालेसफाई कामावर नियंत्रण आणि लक्ष ठेवायचे आहे. मान्सूनपूर्वी आणि वेळेमध्ये नालेसफाई पूर्ण व्हावी, पूर्ण क्षमतेने नालेसफाई व्हावी, यावर या पालक अधिका ऱ्यांनी नियंत्रण ठेवण्याबाबतच्या सूचना आयुक्त पवार यांनी दिल्या होत्या.

यानुसार महापालिका क्षेत्रात मोठे नाले कचरामुक्त आणि गाळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून शंभरफुटी रोडवरील भोबे गटार स्वच्छतेचे काम दोन दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. या संपूर्ण गटारामधून आत्तापर्यंत 22 टन कचरा बाहेर काढण्यात आला असून, यामध्ये सर्वाधिक कचरा हा प्लॅस्टिक बाटल्यांचा निदर्शनास आला आहे. मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिक कचरा, बाटल्या या गटारामध्ये टाकल्या जात असल्यामुळे वारंवार भोबे गटार तुंबण्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे या भोबे गटाराच्या स्वच्छतेला सुरुवात केल्यानंतर उपायुक्त राहुल रोकडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर यांनी पाहणी करत मक्तेदाराला संपूर्ण गटारातील गाळ काढण्याबाबतच्या सूचना केल्या.

पर्यावरणाला घातक असणा ऱ्या प्लॅस्टिकचा हा कचरा या गटारामध्ये टाकला जात असल्याने हे गटर वारंवार तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्लॅस्टिक कचरा हा गटारामध्ये न टाकता महापालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकावा, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.

महापालिका क्षेत्रातील 58 नाले होणार स्वच्छ

सांगली शहराला पुराचा धोका हा सतत होत आहे. 2019, 2021 साली सांगलीत महापुराने थैमान घातले होते. पूर चढताना वेळ लागला नाही, पण पुराचे पाणी उतरण्यासाठी वेळ लागला. याला कारण नालेसफाई ठरली आहे. कित्येक टन प्लॅस्टिक कचरा या नाल्यामध्ये वर्षानुवर्षे साचत असल्याने पाणी निचरा होण्यासाठी वेळ लागतो. म्हणून या वर्षी आयुक्तांनी पूर्णपणे या 58 नाल्यांवर लक्ष केंद्रित करून नालेसफाईला प्राधान्य दिले आहे.