रायगडात लाडक्या बहिणी असुरक्षित;7 महिन्यांत 221 जणींवर अत्याचार

एकीकडे मिंधे सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेचे ढोल पिटत असताना रायगड जिल्ह्यात मात्र या लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत तब्बल 221 महिलांवर अत्याचार झाल्याची आकडेवारी खुद्द सरकारनेच जाहीर केली आहे. त्यात सर्वाधिक 82 घटना या विनयभंगाच्या असून 55 घटनांमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी लोकप्रिय योजनांची घोषणाबाजी करणारे सरकार प्रत्यक्षात मात्र महिलांची सुरक्षा करण्यात फेल झाले आहे.

रायगड जिल्ह्यात महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण यांसारखे मोठे गुन्हे सातत्याने घडत असून दर दिवसाला सरासरी एक महिला या गुन्ह्यात बळी ठरत आहे. बाजारात गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात महिला प्रवाशांशी अंगलट,अल्पवयीन विद्यार्थिनींशी चाळे, महाविद्यालय आवारात छेडखानी, लज्जा उत्पन्न करणारे कृत्य असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात.

लग्नाचे आमिष दाखवून, नोकरीत बढती देण्याचे आमिष तसेच इतर प्रकारे शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या तक्रारीही दाखल होत आहेत. तसेच अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तसेच त्यांचे अपहरण करण्याच्या घटनाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पूर्वी अत्याचाराला बळी पडलेल्या महिला बदनामीला घाबरून गप्प बसत असत. मात्र आता त्या पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करू लागल्या असल्याचे दाखल तक्रारींच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास स्पष्ट होते.

महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथक

रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. त्यांना मोटारसायकल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या पथकाला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्रकिनारे आणि गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित गस्त सुरू असते. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले असून या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक घटनास्थळी दाखल होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. मात्र एवढे प्रयत्न करूनही महिलांसंबंधी गुन्हे कमी झाले नसल्याचे चित्र दाखल गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येते.