लातूरमध्ये पोळा सणानिमित्त एक तरुण बैल धुवायला ओढ्यात गेला होता. पण पावसाचा इतका प्रवाह होता की हा तरुण त्यात वाहून गेला. काल दिवसभर या तरुणाचा शोध घेतल्यावर आज या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. एका तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकाकूल आहे.
जळकोट तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहेत. काल पोळा होता. त्यामुळे नरेश पाटील हा 24 वर्षीय तरुण शेतकरी बैल धुवायला ओढ्याजवळ गेला होता. पण पावसामुळे पाण्याचा प्रवाह इतका होता की त्यात नरेश वाहून गेला.
नरेश पाण्यात वाहून गेला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. तेव्हा ग्रामस्थ, महसूल व पोलीस प्रशासन यांनी नरेशचा शोध घ्यायला सुरवात केली. काल दिवसभर नरेशचा शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर आज सकाळी 11 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास ओढ्यावर असलेल्या गावाजवळील पुलाखाली त्याचा मृतदेह आढळला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल ढोरसांगवीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला वाहून जाऊन पोळा सणाच्या दिवशी मृतदेह सापडल्याने ढोरसांगवीच्या पोळा सणावर द:खाचे सावट पसरले आहे. मंडळ अधिकारी कमलाकर पन्हाळे व तलाठी धामणगाव सज्जा यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे.