Nagpur News- महाराष्ट्रात चार महिन्यांत 25 वाघांचा मृत्यू; 20 नैसर्गिक, रेल्वेच्या धडकेत 1 आणि 4 जणांची शिकार

एकीकडे प्रचंड उन्हामुळे जंगलातील पानवठे सुकल्यामुळे पट्टेदार वाघ पाण्याच्या शोधासाठी जंगलाबाहेर निघाले आहेत. यात वाघांमध्ये आपसातच युद्ध होत आहे.

नागपूर जिह्यातील दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रात 25 वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 20 नैसर्गिक, 1 रेल्वेच्या धडकेत तर 4 जणांची शिकार होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

वन विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वाघाचे वय अंदाजे 18 ते 20 महिन्यांदरम्यान असल्याची माहिती समोर येत आहे. या वाघाचा मृतदेह पाहता त्याचे सर्व अवयव शाबूत आहेत, मात्र शरीराचा मधला भाग इतर मांसाहारी प्राण्यांनी खाल्ला असल्याचे दिसून येते. यावरून झुंजीनंतर लगेचच वाघाचा मृत्यू झाला असावा आणि मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांत इतर प्राण्यांनी त्याचे मांस खाल्ले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

देशभरात 2022 मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेनुसार भारतात एपूण 3,167 वाघांची नोंद झाली आहे. राज्यात 2018 मध्ये नोंदवलेले 312 वाघ 2022 मध्ये वाढून 444 पर्यंत पोहोचले.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 पासून चार महिन्यांत देशभरात एपूण 67 वाघांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू प्रामुख्याने वाघांतील झुंजी, अपघात, बेकायदेशीर शिकार आणि नैसर्गिक कारणांमुळे झालेले आहेत. विशेष म्हणजे, या मृत्यूपैकी सर्वाधिक 25 वाघांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे.

वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू

चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) येथील शुभांगी चौधरी (38), कांताबाई चौधरी (60) आणि रेखा शेंडे (48) अशी मृत महिलांची नावे आहेत. याशिवाय एक महिला जखमी आहे. एकाच पुटुंबातील सासू, सून, नणंद या तिघींचा मृत्यू झाला. सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. अनेक महिला आणि पुरुष यासाठी जंगल परिसरात जात असतात.

आज शनिवारी सकाळच्या सुमारास या चार महिला तेंदू पाने तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. यादरम्यान तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर हल्ला केला. यात शुभांगी आणि कांताबाई चौधरी या सासू-सुना व रेखा शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वंदना गजभिये (50) या जखमी झाल्या. एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू आणि एक महिला गंभीर जखमी झाल्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.