अडीचशे सायकलपटूंनी केली ब्रह्मगिरी परिक्रमा

81
सामना ऑनलाईन , नाशिक

नाशिक सायकलिस्टच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त आज नाशिक-त्र्यंबकेश्वर सायक्लोथॉन घेण्यात आली. यात अडीचशेहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा पूर्ण करीत त्यांनी येथील निसर्गसौंदर्य अनुभवण्याची सुवर्णसंधी साधली.

नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून आज सकाळी 6 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ झाला. नाशिक जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे, महापालिकेतील निवृत्त शहर अभियंता यू. बी. पवार, लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटचे राजेंद्र वानखेडे आणि नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

ब्रह्मगिरी परिक्रमेचे हे सातवे वर्ष आहे, ही परिक्रमा 20 किलोमीटरची आहे. प्रारंभी नाशिक ते त्र्यंबकेश्वर सायकलिंग केल्यानंतर सायकलपटूंनी 20 किलोमीटरची पायी ब्रह्मगिरी परिक्रमा पूर्ण केली. या परिक्रमेसह एकूण 75 किलोमीटर अंतराची सायक्लोथॉन सायकलपटूंनी पूर्ण केली. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान-त्र्यंबक रोड-अंजनेरी-पेगलवाडी-पहिने-गौतम ऋषी टेकडी-दुगारवाडी फाटा-त्र्यंबकेश्वर-नाशिक असा हा मार्ग होता. नाशिकचे पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनीही यात पूर्ण सहभाग घेतला. सायकलिंग आणि ट्रेकिंग असा दुहेरी अनुभव सायकलपटूंना अनुभवता आला. ही सायक्लोथॉन यशस्वी करण्यासाठी निवृत्त शहर अभियंता यू. बी. पवार, योगेश शिंदे, ऍड. वैभव शेटे, डॉ. मनीषा रौंदळ यांचे सहकार्य लाभले.

40 महिलांचा सहभाग

रस्ता संपल्यानंतर गौतम ऋषी टेकडी येथून सुमारे 400 मीटरचा चढ सायकल खांद्यावर घेत सायकलिस्टनी पार केला, त्यांना तेथे राजेंद्र निंबाळते आणि सहकारी स्वयंसेवकांनी मदत केली. या सायक्लोथॉनमध्ये 40 महिलांनी सहभाग नोंदविला.

आपली प्रतिक्रिया द्या