
भिवंडी तालुक्यात सर्पदंशाच्या घटनेमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काँक्रीट रस्ते, विकसित होणाऱ्या टोळेजंग इमारतीमुळे शहरात काँक्रीटचे जंगल उभे राहिले आहे. त्यामुळे सरपटणारे प्राणी लोकवस्तीत घुसू लागले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत तब्बल २५४ जणांना सर्पदंश झाला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाने दिली आहे. दरम्यान, अडगळीच्या ठिकाणी जाणे टाळावे, लहान तसेच ज्येष्ठ नागरिकांनी अंधारात चालताना काठीचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरू आहेत. यंदा पावसाने मे महिन्यापासून हजेरी लावल्याने माळरानावर व शेताच्या रस्त्यावर गवत व झाडेझुडपे प्रचंड वाढली आहेत. या झाडाझुडपातून मार्ग काढताना शेतकरी, तरुण व महिलांना सर्पदंशाचा घटना घडल्या आहेत. सर्पदंश झालेल्या रुग्णांवर शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात येत आहे. दरम्यान, यामध्ये कोणीही व्यक्ती दगावला नसल्याचे स्पष्टीकरण उपजिल्हा रुग्णाल याकडून देण्यात आले आहे.
सर्पदंशाचा लेखाजोखा
जानेवारीत २२, फेब्रुवारी १९, मार्च १६, एप्रिल १७, मे २४, जून ५०, जुलै ५५, ऑगस्ट २९, सप्टेंबर २२ अशा नऊ महिन्यात एकूण २५४ जणांना सर्पदंश झाला आहे.
एखाद्या रुग्णाला सर्पदंश होऊन विषबाधा झाली असेल तर त्या रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासते. रुग्णाची प्रकृती गंभीर असेल अशा वेळेस रुग्णांना ठाणे व मुंबई येथे उपचारासाठी पाठवण्यात येते. सर्पदंश झालेल्या रुग्णांनी मानसिक ताण न घेता शांत राहून त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.
– डॉ. इजहार लाल अन्सारी (वैद्यकीय अधिकारी)