तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग

‘26/11’ च्या मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा याला लवकरच हिंदुस्थानच्या ताब्यात दिले जाणार आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने हिंदुस्थान-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाला हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राजनैतिक माध्यमातून राणाच्या प्रत्यार्पणाला वेग आला आहे. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध राणाचे अपील अमेरिकन कोर्टाने 15 ऑगस्ट रोजी फेटाळले होते.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हेडलीला मदत

राणाने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे. हेडलीने हल्ल्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणांचा शोध घेतला होता. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्रात राणाच्या नावाचा समावेश केला असून पाकिस्तानची आयएसआय आणि दहशतवादी संघटना लश्कर ए तोयबाचा सक्रिय सदस्य म्हणून तो काम करत होता असा त्याच्यावर आरोप आहे.