इराणमध्ये हिजाबच्या मुद्द्यावरून पेटलेल्या आंदोलनाला हिंसक वळण, 36 जणांचा मृत्यू

इराणमध्ये 22 वर्षीय महिलेच्या हत्येवरून सुरू झालेले आंदोलन सुरूच असल्याचे दिसून येत आहे. इराणमध्ये हिजाब न घातल्याने एका महिलेला अटक करण्यात आली होती. काहीदिवसांपूर्वी या महिलेचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर इराणच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. इराणच्या विविध भागांमध्ये झालेल्या आंदोलनांना हिंसक वळण लागून यात किमान 36 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे.

महसा अमिनी या महिलेचा एका आठवड्यापूर्वी इराणमध्ये पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेपासून इराणमध्ये निषेधाची आग धगधगत आहे. सामान्य लोक विशेषतः मोठ्या संख्येने महिला हिजाब परिधान करण्यास विरोध करत आहेत. हिजाब न घातल्यामुळे अमिनीला अटक करण्यात आली होती. सेंटर फॉर ह्युमन राइट्स इन इराण (सीएचआरआय) ने दावा केला आहे की इराणमधील विविध ठिकाणच्या आंदोलनांमध्ये आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील नेत्यांनी शांततापूर्ण आंदोलनाला परवानगी देण्यासाठी इराणवर दबाव आणला पाहिजे. सीएचआरआयने ट्विट करून म्हटले आहे. 16 सप्टेंबर रोजी अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या प्रमुख शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता. राजधानी तेहरान तसेच इस्फहान, मशहद, रश्त आणि साकीझ या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरु आहेत. इराण सरकार आंदोलकांवर दारुगोळा, पेलेट गन आणि अश्रूधुराचा वापर करत सीएचआरआयने एका निवेदनात म्हटले आहे.