दहशतवाद्यांना धडकी भरेल असे पोलीस दलाचे सक्षमीकरण करू

नक्षलवादी, अतिरेक्यांपासून ते भुरटय़ा चोरांपर्यंत सर्वांना पकडणारा पोलीस हा एक महत्त्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे, त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्लाच काय, पण मुंबईचे नावही घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करू, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यात प्राणांची बाजी लावणाऱया शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात हुतात्मा दालनाचे उद्घाटन तसेच काॅफिटेबल बुक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वतःच्या कुटुंबातील, घरातील सुख-दुःख बाजूला ठेवून जनतेच्या सुख-दुःखात सामील होणाऱया आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच हे वचन आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या हुतात्मा दालन उद्घाटन सोहळ्यात शहिदांचे कुटुंबीय विनीता अशोक कामटे, स्मिता विजय साळसकर, तारा ओंबळे, मानसी शिंदे तसेच जिजाबाई आलम यांच्या हस्ते ‘हुतात्मा दालना’चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे काॅफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

  • पोलिसांची कामे ही जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात यावी. देश-विदेशातही पोलीस व लष्करी प्रशिक्षणाची व्यवस्था शालेय जीवनापासून आहे, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. पोलिसांवरील हल्ला ही अत्यंत चुकीची बाब असून त्यांच्या कर्तव्याचा आपण आदर केलाच पाहिजे.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, आमदार भाई जगताप, मुख्य सचिव संजय पुमार, अपर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पोलीस आयुक्त परमवीर सिंग तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. सुहास वारके यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर पोलीस महासंचालक सिंघल यांनी केले.

हुतात्मा दालनातून उलगडणार पोलिसांची शौर्यगाथा

1964 ते 2019 या कालावधीत विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या 797 हुतात्म्यांची एकत्रित माहिती या दालनात उपलब्ध आहे. तसेच विविध फिल्म्सद्वारेही पोलिसांच्या शौर्याची माहिती दालनातून दिली जाते. सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिले जाईल.

‘अतुल्य हिंमत’ युक्ती आणि शक्तीचा सचित्र दस्तावेज

‘अतुल्य हिंमत’ हे युक्ती आणि शक्तीचा वापर करुन पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीचा सचित्र दस्तावेज आहे. या पुस्तकाकडे मुख्यमंत्री, नागरिक आणि कलावंत अशा तिहेरी भूमिकेतून मी पाहत आहे. सुबक मांडणी व सुयोग्य सादरीकरण यात आहे. अशा प्रकारच्या अप्रतिम काॅफिटेबल बुकच्या निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी महासंचालकांचे अभिनंदन केले.

काळजावर झालेली जखम कधीही भरून येणार नाही

शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. 26 नोव्हेंबर हा शौर्यदिन. हा दिवस आपण विसरू शकत नाही. त्या दिवशी मी मुंबई बाहेर होतो. मुंबईतील घटना कळताच प्रथम विजय साळसकरांना फोन लावला. घटनेची माहिती देताना साळसकरांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जात आहे. काही वेळानी मी त्यांना फोन लावला, पण तो फोन उचलला गेलाच नाही आणि ती दुर्दैवी घटना घडली. बारा वर्षे झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या