आंबेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाचे 28 रुग्ण  – सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

648

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात 28 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 28 मे रोजी एकाच दिवशी 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. तर सोमवारी एक रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 28 वर पोहोचली आहे.

31 मे अखेर एकूण 3 रुग्ण पुणे येथून कोरोना मुक्त होऊन बरे झाल्याने त्यांना घरी  सोडण्यात आले आहे. त्यामुळे ॲक्टीव कोविड-19 रूग्णांची संख्या 25 आहे. 28 मे  रोजी प्राप्त अहवालापैकी 6 रुग्ण वडगांव काशिंबेग येथील पूर्वीच्या रूग्णांसोबत मुंबईहून आलेले होते. 1 रूग्ण वडगांव काशिंबेग येथील मुंबईहून आलेला होता. 3 रूग्ण फदालेवाडी- उगलेवाडी येथील मुंबईहून प्रवास करून आलेल्या पूर्वीच्या रूग्णांच्या हाय रिस्क संपर्क यादीतील आहेत. 1 रूग्ण शिनोली येथील पूर्वीच्या रूग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील आहे. तसेच घोडेगांव येथील 1 रूग्ण मुंबई येथून प्रवास करून आलेला असून निरगुडसर येथील रूग्णाचा सहप्रवासी होता.

30 मे रोजी सापडलेले 2 रुग्ण हे मौजे बळती व मौजे गिरवली येथील घाटकोपर मुंबई प्रवासी असून पूर्वीच्या रूग्णांसोबत प्रवासी व नजीकचे नाते संबंधातील व हाय रिस्क संपर्कातील आहेत. सोमवारी सापडलेला 1 रूग्ण मोजे गिरवली येथे मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. हाय रिस्क संपर्क यादीतील सर्व व्यक्तींची पुढील चाचणी करण्यात आलेली आहे.

आंबेगाव तालुक्यामध्ये एकूण 12 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तसेच ॲक्टीव रुग्णांची संख्या 25 अशी आहे. त्याअनुषंगाने प्रतिबंधित क्षेत्रामधील पुढील सर्वेक्षण पथके, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा देण्यासाठी आदेश पारित करण्यात आलेले असून सेवा पुरविण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आवश्यक सर्व सीमाबंद करण्यात आल्या असून पोलिस प्रशासनासोबत इतर विभागाचे कर्मचारी यांना चेक नाक्याच्या ठिकाणी व प्रतिबंधित क्षेत्र येथील आवश्यक कामकाज करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे, असेही  डुडी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या