देशात 24 तासात 28 हजार 498 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 9 लाखांवर

436

देशभरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. गेल्या 24 तासात पुन्हा 28 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाचे संक्रमित रुग्ण आढळत असल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 28 हजार 498 नवे रुग्ण आढळले असून देशातील कोरोनाबाधितांची संख्या 9 लाख 6 हजार 752 झाली आहे. तर गेल्या 24 तासात 553 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील 9 लाख 6 हजार 752 कोरोनाबाधितांपैकी 3 लाख 11 हजार 565 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 71 हजार 460 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशात 23 हजार 727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्ण बेर होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.02 टक्क्यांवर पोहचले आहे.

देशाप्रमाणेच जगभरातही कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण झालेल्या देशांमध्ये हिंदुस्थान तिसऱ्या स्थानावर आहे. कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या अमेरिकेत गेल्या 24 तासात 64,000 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात आढळलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोना संक्रमणात जगभरात दुसऱ्या स्थानावर असलेल्या ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 770 रुग्णांचा मृत्यू झाला असून अमेरिकेत 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत 5.7 लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या