
डिजिटल स्कूल, सेमी इंग्रजी, घरोघरी जाऊन विद्यार्थी वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, मोफत गणवेश, शालेय पोषण आहार यासह विविध योजना राबवूनही रायगडात जिल्हा परिषदेच्या 29 मराठी शाळांना टाळे लागले आहेत. बहुतांश पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये टाकत असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने रोडावत आहे. त्यामुळे 2025-26 या शैक्षणिक वर्षात 29 मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या असून उर्वरित विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षण हे पूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया मानला जात होता. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणारे प्राथमिक शिक्षणच त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरत होते. मात्र अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना घरघर लागलेली पाहावयास मिळत आहे. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अगदी शेवटच्या घटकातील पालकही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये पाठवू लागला असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. पटसंख्येला रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या असून, पटांगणही आहेत. उत्तम शिक्षकवर्ग आहे. सर्व सुविधांयुक्त शाळा असूनही विद्यार्थी टिकविणे शाळेतील शिक्षकांना शक्य झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या काही शाळा या वाखाणण्याजोग्या आहेत, तर काही शाळेत 2०च्या आत पटसंख्या आहे. त्यामुळे कमी पटसंख्येअभावी शाळा बंद पडत लागलेली गळती रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, डिजिटल स्कूल, पोषण आहार, सेमी इंग्रजी शिक्षण, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, घरोघरी जाऊन पाल्याला जिल्हा परिषद शाळांमध्ये टाकावे यासाठी आहेत.
2024-25 या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या 2 हजार 502 शाळा सुरू होत्या. मात्र पटसंख्येअभावी 2025-26 या शैक्षणिक वर्षात यापैकी 29 शाळा बंद झाल्या. यामुळे सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या 2 हजार 473 शाळा सुरू आहेत. पटसंख्येअभावी 2026-27 या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थी संख्या अजून घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालकांच्या भेटीगाठी यासह गुणवत्ता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र एवढे उपाय करूनही शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थी पटसंख्येत घट होत आहे. यावर्षी रायगड जिल्ह्यातील 29 शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत.


























































