
विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, प्रवेश प्रक्रियेची माहिती व शैक्षणिक प्रगतीचा तपशील एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे अपार आयडी कार्ड आधार कार्डच्या अटीमुळे लटकले आहे. रायगडातील तब्बल २९ हजार विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. आधार कार्ड नसणे, आधार कार्डवर नमूद झालेली चुकीची नावे, चुकीची स्पेलिंग, पालकांच्या नावातील दुरुस्ती तसेच जन्म तारखेतील फरकांमुळे या विद्यार्थ्यांची फरफट होत आहे.
रायगड जिल्ह्यात ५ लाख ५३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण व शैक्षणिक वाटचालीसाठी सरकारकडून अपार आयडी कार्ड अनिवार्य केले आहे. या मोहिमेला रायगडातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास ८८ टक्के विद्यार्थ्यांनी अपार आयडी कार्डची यशस्वी नोंदणी केली आहे. मात्र उर्वरित २९ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड आधार कार्डमुळे बाद झाले आहेत. आधार कार्डवरील नाव आणि शाळेत नोंदवलेल्या नावामध्ये तफावत, आडनाव नसणे, जन्म दाखला नसल्याने ही कार्ड मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. विशेषतः परप्रांतातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मूळ गावी जाऊन नव्याने जन्म दाखला काढण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. आधार कार्डच्या दुरुस्ती किंवा नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी महसूल विभागातर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. मात्र निरक्षर पालक, रोजगारासाठी इतर जिल्ह्यांत स्थलांतरित झालेल्या पालकांमुळे या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे काम लटकले आहे.
शिक्षण विभागासमोर आव्हान
राज्यात सरासरी ८६.७८ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड तयार झाले आहे. त्यात गडचिरोली, सातारा, अहिल्यानगर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अपार आयडी कार्डची टक्केवारी ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर गोंदिया, वर्धा, भंडारा, परभणी जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांचाही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आधार कार्डचे व्हॅलिडेशन पूर्ण होत नसल्याने रायगडातील विद्यार्थ्यांची प्रक्रिया थांबली आहे. या विद्यार्थ्यांच्या अपार कार्डची १०० टक्के नोंदणी पूर्ण करून घेण्यासाठी रायगड शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.





























































