देशात 30 टक्के महिलांचा जोडीदाराकडून छळ; जगभरात 84 कोटी महिला लैंगिक शोषणाच्या शिकार

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार,  अंदाजे 30 टक्के महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून छळ सहन करावा लागत आहे. म्हणजेच त्यांना त्यांच्या पती किंवा जोडीदाराकडून मानसिक, आर्थिक आणि लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 15 ते 49 वयोगटातील पाचपैकी एक महिला हा त्रास सहन करत आहे.  जगभरात सुमारे 84 कोटी महिलांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी लैंगिक अत्याचाराचा अनुभव घेतला आहे.

168 देशांचा अभ्यास करणारा हा अहवाल  2000 ते 2023 दरम्यान केलेल्या सर्वेक्षण आणि अभ्यासांचा ‘सर्वसमावेशक आढावा’ आहे. जागतिक स्तरावर, 15-49 वयोगटातील 8.4 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराशिवाय इतरांकडून लैंगिक हिंसाचार अनुभवला आहे,  असे अहवालात म्हटले आहे. 2000 पासून हा आकडा फारसा बदललेला नाही.

अहवालात असे नमूद केले आहे की, महिलांवरील हिंसाचारात सुधारणा होण्याची गती खूपच मंद आहे आणि 2030 पर्यंत महिलांवरील हिंसाचार निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे कठीण दिसते.

निधीची कमी

2022 मध्ये जागतिक विकास मदत निधीचा फक्त 0.2 टक्के  भाग महिलांवरील हिंसाचार रोखणाऱ्या कार्यक्रमांना देण्यात आला होता. 2025 मध्ये निधी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मानवतावादी संकटे, युद्ध आणि हवामान आपत्ती  महिलांवरील हिंसाचाराचा धोका आणखी वाढवत आहेत.

अहवालातून केलेल्या  शिफारसी

हिंसाचार रोखण्यासाठी पुराव्यावर आधारित कार्यक्रमांचा विस्तार करा.

महिला आणि मुलींना सक्षम बनवणारे कायदे काटेकोरपणे अमलात आणले पाहिजेत.

पीडित महिलांसाठी आरोग्य, कायदेशीर आणि सामाजिक सेवा मजबूत केल्या पाहिजेत.

सुधारणांचा मागोवा घेण्यासाठी सुधारित डेटा सिस्टम.