सांगलीतील 30 हजार शेतकरी होणार कर्जमुक्त, जिल्हा बँकेच्या 743 कोटींच्या वसुलीसाठी ‘ओटीएस योजना’

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱयांच्या थकीत पीककर्जाच्या वसुलीसाठी एकरकमी कर्जवसुली योजना (ओटीएस) सुरू केली आहे. जूनअखेरची पीककर्जाची सुमारे 743 कोटी थकबाकी आहे. जिह्यात सुमारे 30 हजार थकबाकीदार शेतकरी असून, त्यांना 30 जूनअखेर ‘ओटीएस’ योजनेचा लाभ घेता येणार आहे. यानिमित्ताने वर्षानुवर्षे थकीत असलेल्या शेतकऱयांना कर्जमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

सांगली जिल्हा बँकेचा एनपीए 14 टक्क्यांवर गेला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत बँकेने थकबाकी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत बिगरशेतीसह शेती कर्जाला एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना सुरू केली. बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात बँकेचा एनपीए 5 टक्क्याच्या आत आणण्याचा निर्धार केला आहे.

शेती कर्जाच्या वसुलीवर शिवाजीराव वाघ यांनी मागील वर्षभरापासून विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱयांनी ओटीएस योजनेचा लाभ घेत थकबाकी भरावी. यासाठी वाघ यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱयांना तालुक्यात पाठवून शेतकऱयांच्या बांधावर जाण्यास भाग पाडले होते. शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी जत तालुक्यातील वसुलीसाठी अन्य तालुक्यांतील अधिकारी, कर्मचाऱयांना कामाला लावले. गतवर्षी याचे चांगले परिणाम दिसून आले होते. त्यामुळे पुन्हा ओटीएस योजना लागू केली आहे.

पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकेने तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचाऱयांना वसुलीचे टार्गेट दिले होते. यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यातून 99.90 टक्के झाली आहे. त्या खालोखाल शेती कर्जाच्या वसुलीवर शिवाजीराव वाघ यांनी मागील वर्षभरापासून विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱयांनी ओटीएस योजनेचा लाभ घेत थकबाकी भरावी. यासाठी वाघ यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱयांना तालुक्यात पाठवून शेतकऱयांच्या बांधावर जाण्यास भाग पाडले होते.

शेतकऱयांना व्याजमाफी मिळणार – आमदार मानसिंगराव नाईक

सांगली जिल्हा बँकेने यापूर्वी शेतकऱयांना दिलेल्या ओटीएस योजनेमुळे थकबाकी वसुलीत वाढ झाली आहे. त्या धर्तीवर पुन्हा थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ओटीएस योजना सुरू केली आहे. ओटीएस अंतर्गत शेतकऱयांना व्याज माफी देण्यात येईल. या व्याजमाफीची तरतूद बँकेच्या नफ्यातून करणार आहे. मार्च 25 अखेर बॅँकेचा एनपीए 5 टक्क्यांच्या आत आणण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.

सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यातून

पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकेने तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचाऱयांना वसुलीचे टार्गेट दिले होते. यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यातून 99.90 टक्के झाली आहे. त्याखालोखाल वाळव्यातून 86.86 टक्के झाली आहे. सर्वात कमी जत तालुक्यातून 47 टक्के वसुली झाली आहे. वसुलीमध्ये पलूस 73 टक्के, शिराळा 78, आटपाडी 77, खानापूर 74, तासगाव 59, कवठेमहांकाळ 58.76 आणि मिरज 66 टक्के वसुली झाली आहे. उर्वरित वसुलीला ओटीएसचा आधार मिळण्याच्या आशा आहेत. पीक कर्जाच्या ओटीएस योजनेमुळे जिह्यातील थकबाकीदार सुमारे 30 हजार शेतकऱयांना कर्जमुक्त होण्याची संधी मिळणार आहे.