
तालुक्यातील आदर्श गाव हिवरेबाजार व लगतच्या टाकळी खादगाव, तसेच पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ परिसरात गेल्या 15 दिवसांत लागोपाठ 31 गायी अज्ञात आजाराने दगावल्या होत्या. दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी पशुखाद्यातून प्रथिनांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे ‘अल्कलोसिस’ (विषबाधासदृश) आजाराने 31 संकरित गायी दगावल्याचे पशुवैद्यकीय विभागाच्या प्रयोगशाळेत निष्पन्न झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. उमेश पाटील यांनी दिली.
अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरेबाजार व लगतच्या टाकळी खातगाव, तसेच पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ परिसरात गेल्या काही दिवसांत लागोपाठ 31 गायी अज्ञात आजाराने दगावल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. आमदार काशिनाथ दाते व ‘आदर्श गाव योजने’चे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याकडून चौकशीची मागणी करण्यात आली होती. जिल्हापातळीवरील पशुवैद्यकीय विभागाच्या तपासणीत गायी दगावण्याचे कारण निष्पन्न होऊ शकले नाही.त्यामुळे दगावलेल्या गायींचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र, त्यातही नेमके कारण आढळले नाही. त्यामुळे राज्यपातळीवरून क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ व पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या पथकांनी नमुन्यांची तपासणी केली. त्यामध्ये गायींना कोरडा चारा न देता दूध वाढविण्यासाठी दिल्या जात असलेल्या पशुखाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. त्यातून ‘अल्कलोसिस’ (विषबाधासदृश) आजाराने गायींचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संकरित गायींसाठी 16 ते 20 टक्क्यांपर्यंत प्रथिने आवश्यक असतात. मात्र, या घटनेमध्ये वापरल्या गेलेल्या पशुखाद्यामध्ये 24 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने होती. गायींना कोरडा चाराही दिला जात नव्हता. त्याचा परिणाम होऊन गायींना ‘अल्कलोसिस’ आजार झाला व त्यातून गायींचा मृत्यू झाल्याचे निदान तपासणीमध्ये करण्यात आले आहे. दगावलेल्या 31पैकी 30 गायी संकरित आहेत.
गायींना संतुलित आहाराची आवश्यकता असते. गायी दगावल्याच्या घटनांमध्ये पशुखाद्यातील प्रथिनांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त आढळले व कोरडा चाराही दिला जात नव्हता. त्यातून ‘अल्कोलोसिस’ होऊन झालेल्या आजाराला गायी बळी पडल्या.
– डॉ. उमेश पाटील, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग.




























































