हिंदुस्थानी सैन्याची ताकद आता अनेक पटींनी वाढणार आहे. हिंदुस्थानने अमेरिकेसोबत 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याचा करार केला आहे. दोन्ही देशांमधील या करारावर दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केली आहे. हा करार 32 हजार कोटी रुपयांचा आहे. या करारामुळे सशस्त्र दलांची देखरेख क्षमता वाढणार आहे. संरक्षणविषयक पॅबिनेट समितीने गेल्या आठवडय़ातच या कराराला मंजुरी दिली होती. हिंदुस्थानने 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याचा करार गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीदरम्यान केला होता. संरक्षण तज्ञांच्या मते, प्रीडेटर ड्रोन एमक्यु- 9 बी मुळे हिंदी महासागरात हिंदुस्थानी नौदलाची देखरेख शक्ती अनेक पटींनी वाढेल. या करारांतर्गत मिळालेल्या 31 प्रिडेटर ड्रोनपैकी नौदलाला 15 ड्रोन मिळणार आहेत. तर हवाई दल आणि लष्कराला प्रत्येकी 8 ड्रोन मिळणार आहेत.
नौदलाची क्षमता वाढणार
हिंदी महासागरात चीन आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, हिंदुस्थानी नौदलही आपली क्षमता वाढवत आहे. आता प्रीडेटर ड्रोन्स मिळाल्यानंतर नौदलाची ताकद वाढणार आहे, कारण हे प्रीडेटर ड्रोन सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात मंगळवारी दोन करारांवर स्वाक्षऱया झाल्या. 31 प्रीडेटर ड्रोन मिळणार आहेत, तसेच ड्रोनची देखभाल, दुरुस्तीची सुविधा मिळणार आहे.