India Pakistan War – 32 विमानतळांवरील उड्डाणे बंद

हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाने 9 मे 2025 पासून ते 15 मे 2025 च्या पहाटे 5.30 पर्यंत उत्तर आणि पश्चिम हिंदुस्थानातील तब्बल 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणे बंद करण्याचा निर्णय जारी केला आहे.

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सीमेवरील भागात हाय अलर्ट जारी करण्यता आला आहे. त्यामुळे श्रीनगर, अमृतसर, जम्मू,  लेह, चंदिगड, जोधपूर, भूज, जामनगर, जैसलमेर आणि बिकानेर यांसारख्या प्रमुख विमानतळांसह 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणसेवा बंद करण्यात आली आहे.

पंजाबमधील काही भागांत ब्लॅकआऊट

पंजाबच्या फिरोजपूर, बर्नाला, पठाणकोट आणि इतर सीमावर्ती भागात आज सायंकाळी ब्लॅकआऊट करण्यात आला. तसेच फिरोजपूरमध्ये 8 वाजून 40 मिनिटांनी ब्लॅकआऊट करण्यात आला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवा पसरवू नये आणि सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन करतानाच सावधगिरीचा उपाय म्हणून ब्लॅकआऊट करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

ड्रगनची दर्पोक्ती, आम्ही पाकिस्तानसोबत

आम्ही पाकिस्तानसोबत असल्याची घोषणा चीनने केली आहे. सार्वभौमत्व, क्षेत्रीय अखंडता आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही पाकिस्तानसोबत उभे असल्याचे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले आहे. वांग यी यांनी आज पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्यासोबत पह्नवरून चर्चा केली. त्यानंतर वांग यी यांनी चीनचा निर्णय जाहीर केला.

बंदमध्ये या विमानतळांचा समावेश

अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भूज, बिकानेर, चंदिगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुलू-मनालीतील भुंतर, लेह, लुधियाना, मुंद्रा, नालिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोटचे हिरासर, सरसावा, शिमला, श्रीनगर, थोइसे, उत्तरलाई. दिल्ली आणि मुंबई या विमानतळांवरील नागरी उड्डाणसेवा बंद करण्यात आली आहे.