शिरूरमधील भाविकांवर काळाचा घाला, चार ठार

गुढीपाडव्याला देवदर्शन करून मध्यरात्री परत गावाकडे निघालेल्या शिरूर तालुक्यातील भाविकांवर काळाने घाला घातला. नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत. मृत व जखमी भाविक पुणे जिह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत. शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते.

राजेंद्र विष्णू साळवे (वय 38), विक्रम राजेंद्र अवचिते (वय 29, दोघे रा. आमदाबाद, ता. शिरूर, जि. पुणे), धीरज विजय मोहिते (वय 14, रा. चिंचोली मोराची, ता. शिरूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मयूर संतोष साळवे (वय 22, रा. आमदाबाद, ता. शिरूर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर प्रदीप भाऊसाहेब साळवे, गुरुनाथ रावसाहेब साळवे, ओंकार जालिंदर गोरखे, सोमनाथ बापू बोरगे, संदीप शिवाजी साळवे, समाधान श्रावण साळवे, अक्षय किसन साळवे, ऋतिक किसन साळवे, खंडू नरवडे, सोमनाथ शहाजी साळवे यांच्यासह 12 भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिरूर तालुक्यातील आमदाबाद आणि मोराची चिंचोली येथील 16 भाविक एका टेम्पोमधून नगर जिह्यातील देवगड आणि शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. शनिशिंगणापूर येथे दर्शन घेऊन नगरमार्गे मध्यरात्री नगर-पुणे महामार्गावरून शिरूरकडे जात असताना कामरगाव शिवारात त्यांच्या टेम्पोचा अपघात झाला. महामार्गावरील चौधरी ढाब्याजवळ पुण्याकडून येणाऱया मालट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक रस्तादुभाजक ओलांडून समोरून एका बाजूने या पिकअपवर आदळला. त्याचवेळी नगरहून पुण्याकडे चाललेला कंटेनर या भाविकांच्या टेम्पोवर पाठीमागून आदळला. या दोन वाहनांमध्ये टेम्पो सापडल्याने पाठीमागे बसलेले तिघे जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक रणजित मारग, जगदीश जंबे व पथक अपघातस्थळी गेले. पोलीस पथकाने हॉटेल व्यावसायिक, कामरगाव ग्रामपंचायत सदस्य मनोज ठोकळ आणि मृत्युंजयदूत सिद्धांत आंधळे यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढली. तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.