
लडाखजवळील नियंत्रण रेषेजवळील हिंदुस्थानी हद्दीत घुसलेले 40 चिनी याक हिंदुस्थानने चीनला परत केले आहेत. याशिवाय या याकांच्या मालकांनाही हिंदुस्थानच्या हद्दीत न येण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच 40 चिनी याक पूर्व लडाखच्या डेमचोक भागात भरकटले होते. या घटनेची माहिती चुशुल समुपदेशक (काउंसिलर) कोन्चोक तेन्झिन यांनी 19 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर शेअर केली होती. जेव्हा हिंदुस्थानी प्राणी चीनच्या हद्दीत जातात तेव्हा ते पुन्हा हिंदुस्थानला परत केले जात नाहीत. मात्र हिंदुस्थानने चीनला त्यांचे याक परत केले आहेत, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हिंदुस्थानी लष्कराने त्यांच्या प्रोटोकॉलनुसार चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीला घटनेची माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी याक परत करण्यात आले. चीन अनेकदा LAC वर आपला दावा करण्यासाठी वेगवेगळ्या हालचाली करत असतो. लडाखमध्ये चराई क्षेत्रावरून सातत्याने वाद होत आहेत. हे क्षेत्र हिंदुस्थानच्या आदिवासी समुदायांसाठी महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी शतकानुशतके तेथे त्यांची जनावरे चरण्यासाठी आणली आहेत.
2020 नंतर प्रकरणांमध्ये वाढ-
2020 मध्ये LAC वर हिंदुस्थानी आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या भागात चरणाऱ्या प्राण्यांची संख्या 2019 मध्ये 56,000 होती. दरम्यान 2021 मध्ये 28,000 वर आली आहे. तर अलिकडच्या वर्षांत ही संख्या पुन्हा वाढून सुमारे 58,000 इतकी झाली आहे.