40 शेतकऱयांची 5 लाखांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासकीय योजनेतून सौर कृषी पंप मिळवून देण्याच्या नावाखाली केहगावच्या दोघांनी आणि श्रीगोंदा येथील एकाने श्रीरामपूर येथील ‘सेतू’ केंद्रचालकाकडून 40 शेतकऱयांचे अर्ज भरून घेऊन त्यांच्याकडून सुमारे पाच लाख 47 हजार रुपये जमा केले. त्यानंतर अनेक महिने उलटूनही पंप बसवून न देता आणि त्या शेतकऱयांच्या नावासमोर अगोदरच वापरलेल्या शेतकऱयांचे ग्राहक क्रमांक टाकून शेतकरी व ‘महावितरण’ची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ओंकारेश्वर राजेंद्र रासकर, किरण बोरुडे (दोघे रा. केडगाव, अहिल्यानगर), संदीप बनकर (रा. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संदीप म्हाळू राऊत (वय 35, रा. निपाणी बडगाव, ता. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

संदीप राऊत यांचे सेतू केंद्र आहे. त्यांच्याकडे परिसरातील 40 शेतकऱयांनी सौर कृषी पंप मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. या तिघांनी सन 2024मध्ये फिर्यादीशी संपर्क साधून, आपण सोलर कंपनीचे सबडीलर असल्याचे सांगत शेतकऱयांना सौर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच 40 शेतकऱयांकडून आगाऊ रकमा जमा करायला लावल्या. राऊत यांनी शेतकऱयांकडून पाच लाख 47 हजार रुपये जमा करून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात आरोपींकडे दिली. त्यानंतर फेब्रुवारी 2025पर्यंत एकाही शेतकऱयाला सौर कृषी पंप बसवून दिला नाही. फिर्यादी यांनी त्यांना अनेकदा संपर्क करूनही आरोपींनी टाळाटाळ केली. राऊत यांनी चौकशी केली असता, शेतकऱयांच्या नावासमोर अगोदरच वापरलेल्या शेतकऱयाचे ग्राहक क्रमांक ऑनलाइन टाकलेले आढळले. या तिघांनी आपणासह 40 शेतकऱयांची, तसेच महावितरण कंपनीचीही फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यावर संदीप राऊत यांनी याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.