ऐन चाळीशीत डोक्याला ताप! अनुभव ठरतोय घातक,नोकरीवर कुऱ्हाड कोसळण्याचा धोका

एकेकाळी वयाची 40 वर्षे म्हणजे करिअरचे सुवर्णकाळ मानले जायचे. या टप्प्यावर प्रोफेशनल्सकडे अनुभवाची शिदोरी आणि नेतृत्व करण्याची क्षमता असते, असे मानले जात असे. मात्र, सध्याच्या कॉर्पोरेट जगतात चित्र बदलताना दिसत आहे. ज्या वयात करिअरची नवी शिखरे सर करायची असतात, तिथेच अनेक अनुभवी व्यक्तींसाठी संधीचे दरवाजे बंद होऊ लागले आहेत.अनुभवाला महत्त्व देण्याऐवजी त्याला एक प्रकारचा ‘अडथळा’ मानले जात आहे, ही आजची विदारक स्थिती तयार झाली आहे.

सध्या मार्केटमध्ये GenZ पिढी किंवा 30 शीतल्या कर्मंचाऱ्यांना बोलबाला आहे. सध्याच्या भरती प्रक्रियेत 20 ते 30 वयोगटातील लोकांना नोकरीची संधी उपलब्ध आहे. कंपन्यांच्या मते, तरुण कर्मचारी कमी पगारात उपलब्ध होतात, त्यांना प्रशिक्षित करणे सोपे असते आणि ते नवीन तंत्रज्ञान लवकर आत्मसात करतात. ‘आम्हाला अधिक उत्साही कर्मचारी हवा किंवा ‘तुम्ही या कामासाठी ओव्हरक्वालिफाईड आहात’ अशी कारणे देऊन 40 पार केलेल्या कर्मचाऱ्यांना नाकारले जात आहे. यामुळे मिड-करिअरमधील अनेकजण आज नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहेत.

अहवालानुसार, 15 वर्षांचा अनुभव असलेल्या एका वरिष्ठ एचआर कर्मचाऱ्याला अनेक महिने जॉब मिळत नव्हता. रिक्रूटर्सनी पगार जास्त असल्याचे कारण सांगून त्यांना साधी मिड-लेव्हलची नोकरीही दिली नाही. ‘कल्चर फिट’ किंवा ‘तरुण टीमसोबत जुळवून घेता येणार नाही’ असे सांगून त्यांना टाळले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

काय सांगतात आकडेवारी?
LinkedIN च्या अहवालानुसार, 60 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी योग्य संधी अभावी आपले क्षेत्र किंवा भूमिका बदलली आहे. दर तीनपैकी एक कर्मचारी कामात काहीही फायदा होत नसल्यास नोकरी सोडत आहे. मात्र अनुभवातून घ़डलेल्या व्यक्तीचे महत्त्व आणि त्याची निर्णयक्षमता एका क्षणात निर्माण होऊ शकत नाही. हे सत्य कंपन्या विसरत चालल्या आहेत. त्यामुळे कधी कधी यामुळे कंपनीला तोटा देखील होतो.