एटीएमचे कार्ड बदलून परस्पर 40 हजार रुपये काढले, अज्ञात दोघांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

बँकेत एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तिथे असणार्‍या दोघांनी एटीएम कार्ड बदलले आणि परस्पर बँक खात्यामधून एटीएमच्या सहाय्याने 40 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात दोघांविरुध्द अहमदपूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणूक प्रकरणी संभाजी दिगांबर हिंदोळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, जाधव पेट्रोलपंपाशेजारी असणार्‍या एसबीआय बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी ते गेलेले होते. 10 हजार रुपये काढत असताना ओटीपी मागण्यात आला. त्यामुळे त्यांनी काहीतरी चुकले असे वाटले म्हणून त्यांनी कार्ड मशिनमधून बाहेर काढले. त्यावेळी तिथे असणार्‍या दोघांनी त्यांना एटीएम बरोबर बसले नसेल असे सांगून एटीएम कार्ड घेतले. आणि कार्ड बदलून ते फिर्यादीला परत केले. एटीएम मधून ते बाहेर पडले असता त्यांच्या मोबाईलवर 9500 रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांनी तुमचे काही चुकले असेल तर पैसे परत येतील असे सांगितले. परंतु नंतर पुन्हा तीन वेळेस 9500 रुपये प्रत्येकी आणि एक वेळेस 2 हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. शिरुर ताजबंद येथील एटीएमसेंटर मधून रक्कम काढण्यात आल्याचे बँकेतून समजले. अज्ञात व्यक्तींनी तब्बल 40 हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली. दोघांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.