
सामना प्रतिनिधी । नांदेड
अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील बेपत्ता असलेल्या तरुणाचा खूनच झाला असून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने या प्रकरणाचा छडा लावत संशयित मारेकऱ्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. देवीदास दत्तराम बारसे असे मृत तरुणाचे नाव आहे.
अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील रहिवासी देवीदास दत्तराम बारसे (40) हे २१ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या एका नातेवाईकाला उपचारासाठी नांदेडला घेऊन गेले होते. या नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करुन ते गावी जातो म्हणून निघाले ते गावाकडे परतले नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर अर्धापूर पोलीस ठाण्यात प्रकाश बारसे यांनी देवीदास बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. तरीही त्यांचा शोध लागला नाही. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला नांदेड शहरातील डंकीन भागातील नाल्यात छिन्नविच्छिन्न स्थितीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या फोटो सोशल मीडियातून व्हायरल केल्यानंतर हा मयत बेपत्ता देवीदासच असल्याची ओळख पटली.
घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. देवीदास बारसे यांचा खूनच झाल्याचा निष्कर्ष पोलीस यंत्रणेने काढला आहे. या प्रकरणाच्या तपासार्थ स्थानिक गुन्हे शाखा पथक नांदेड तालुक्यातील सुगाव, कोटीतीर्थ भागात गस्तीवर असताना संशयित मारेकऱ्यांविषयी गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर या पथकाने आपला मोर्चा विष्णुपुरी धरणाच्या बाजूला असलेल्या पांदण रस्त्याच्या दिशेने वळविला. तेव्हा 30 जानेवारी रोजी रात्री त्यांना तेथे एक संशयित इसम आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने या घटनेचा उलगडा करीत तपशीलवार माहिती दिली. 21 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता देवीदास बारसे याला चैतन्यनगर मार्गावरील एका रुग्णालयासमोरुन आपल्या दुचाकीवर संशयित मारेकरी प्रल्हाद वाघमारे व त्याची मेहुणा सत्यनारायण उराडे रा.कोटीतीर्थ यांनी देवीदासला घेतले आणि नांदेड ते सुगाव मार्गावरील पुलाच्या बाजूस असलेल्या पांदण रस्त्यावर नेऊन तेथे त्याचा खून केला व मृतदेह पोत्यात भरुन नदीपात्रात टाकल्याची कबुली आरोपींनी दिली.
प्रल्हादच्या मेहुणीस देवीदास हा सतत फोन करुन त्रास देत असल्याने आम्ही त्याला निर्जनस्थळी नेऊन बुटाने, लाथांनी, बुक्क्या व लाकडाने बेदम मारहाण करीत ठार केले असेही आरोपींनी सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. आरोपीला वजिराबाद पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.























































