पूरबाधितांसाठी 41 निवारा केंद्रे; 4 लाख 66 हजार नागरिक सुरक्षितस्थळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील 4 लाख 66 हजार 963 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या नागरिकांसाठी 441 तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या 33 पथकांसह आर्मी, नौदल, तटरक्षक दलाची एकूण 111 बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिह्यांमध्ये 105 बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 54 तर सांगली जिल्ह्यात 51 पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत. पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील 12 बाधित तालुक्यांतील 2 लाख 47 हजार 678 तर सांगली शहरासह जिल्ह्य़ातील चार बाधित तालुक्यांतील 1 लाख 73 हजार 89 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हय़ात 208 तर सांगली जिल्ह्य़ात 108 तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

पावसामुळे पूरस्थितीत असलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये बचाककार्य जोमाने सुरू आहे. यामध्ये सातारा जिह्यातील सहा तालुक्यांतील 118 गावांमधील 9 हजार 521, ठाणे जिल्ह्यामधील सात तालुक्यांतील 25 गावांमधील 13 हजार 104, पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील 108 गावांमधील 13 हजार 500, नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील 5 गावांमधील 3 हजार 894, पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील 58 गावांमधील 2 हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यांतील 12 गावांमधील 687, रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील 60 गावांमधील 3 हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात तालुक्यांतील 18 गावांमधील 490 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

70 तालुके पूरग्रस्त
पूरस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांमध्ये 70 तालुके बाधित झाले आहेत. यातील पूरग्रस्त गावांची संख्या 761 इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदतकार्य मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.