
शासनाच्या विविध योजनांचा आर्थिक लाभ उठवण्याच्या उद्देशाने खोटी मृत्यू-दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करण्यासह कंत्राटदारांची खोटी प्रमाणपत्रे दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या माध्यमातून कागल, राधानगरी, भुदरगड तसेच पन्हाळा तालुक्यातील 25 जणांनी शासनाच्या विविध योजनांमधून 44 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिसांत दाखल झाला आहे.
सांगली येथील सहायक कामगार आयुक्त रोहित विश्वनाथ गोरे (वय 34, शंभर फुटी रोड, विश्रामबाग, जि. सांगली) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरू आहेत. या योजनांचा आर्थिक लाभ उठवण्याच्या उद्देशाने अनिल कळके, सुनीता बावडेकर, शुभम तुरंबेकर, रूपाली कोगनुळे, सागर वाघरे, सुनील भराडे, दत्तात्रय मोरबाळे, सुरेश भोई, आतिष दाभोळे, बाळ लोंढे आदी 25 जणांनी मार्च 2022 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत शाहूपुरी व्यापार पेठेतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात खोटी मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तसेच 90 दिवस वा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याबाबतचे कंत्राटदार, ठेकेदार, विकासकाची खोटी प्रमाणपत्रे सादर केली. या माध्यमातून शासनाची दिशाभूल करून शासकीय योजनांचा फायदा उठवत 44 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सांगली जिह्यातील एकाचा समावेश आहे. सांगली येथील सहायक कामगार आयुक्त रोहित गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसांत हवालदार पी. एल. यळुरकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर गुनवरे हे तपास करीत आहेत.