ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी शिक्षकांनी योगदान द्यावे – सोनाली निकम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी राज्यासह देश स्तरावर आपल्यातील कौशल्य दाखवीत आहेत. यापूर्वी अनेकदा रत्नागिरी जिल्ह्याचे नांव विविध क्षेत्रात झळकले आहे. आता विज्ञान करीत असलेली प्रगती लक्षात घेता विशेष करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विज्ञानात नेत्रदीपक प्रगती करावी यासाठी शिक्षकांनी मोठे योगदान द्यावे असे आवाहन संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती सोनाली निकम यांनी कोळंबे ता. संगमेश्वर येथे बोलतांना केले.

संगमेश्वर तालुक्याच्या ४४ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सभापती सोनाली निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कोळंबे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये, सचिव दिलीप मुळ्ये,संचालक अमोल पाटणे, सुरेंद्र मयेकर, गट विकास अधिकारी जे. पी. जाधव, गट शिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, विस्तार अधिकारी एस. पी. त्रिभुवने, पी. एस. जाधव, जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, पं.स. सदस्य वेदांती पाटणे, सरपंच सौ. पाटणे, मुख्याध्यापक मिलींद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात गट शिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी कोळंबे शाळेने केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात प्राथमिक विभागाची ६६ तर माध्यमिक विभागाची ३८ मॉडेल मांडण्यात आली आहेत. तसेच शिक्षक विभागात प्राथमिक मधून ७ आणि माध्यमिक मधून ८ शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. लोकसंख्या शिक्षण मध्ये प्राथमिक मधून ३ तर माध्यमिक मधून ३ जणांनी सहभाग घेतला आहे. याबरोबरच प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण २७ शाळांनी भाग घेतला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

आपल्या मनोगतात गट विकास अधिकारी जे. पी. जाधव म्हणाले की, प्रज्ञा किंवा ज्ञान म्हणजे विज्ञान . विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक कुतूहल निर्माण करणारे विज्ञान असल्याने शिक्षकांनी विज्ञानवादी विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज आहे. अज्ञानातून बाहेर येण्यासाठी विज्ञानाची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अशा विज्ञान प्रदर्शनातून आपली जिज्ञासा जागृत करावी असे आवाहन केले. श्रध्दा जरुर असावी मात्र तीचे रुपांतर अंधश्रद्धेत होवू नये यासाठी समाजामध्ये जागृती करण्याकरीरा विज्ञानातील विविध प्रयोग कामी येत असल्याबद्दल जाधव यांनी समाधान व्यक्त केले.

कोळंबे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये आपल्या मनोगतात म्हणाले की, कोकणच्या ग्रामीण भागात आज अनेक अडचणींना तोंड देत शिक्षण संस्था ज्ञानदानाचे पवित्र कार्य पार पाडत आहेत. ग्रामीण भागातून विज्ञानाची चळवळ अधिकाधिक रुजणं आवश्यक आहे. काही अंशी ग्रामीण भागात विज्ञान समजून घेणं कठीण असल्याची भिती विद्यार्थ्यांमध्ये फार पूर्वी पासून आहे. विद्यार्थ्यांमधील विज्ञाना बाबतची ही भिती दूर होणे आवश्यक असल्याचे मत नयन मुळ्ये यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या माधवी गीते, पंचायत समिती सदस्य वेदांती पाटणे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रशालेचे मुख्याध्यापक मिलींद जोशी यांनी आभार प्रदर्शनात बोलतांना ज्ञान मिळाले की, भयमूक्त जीवन जगता येते यासाठी श्रध्दा ठेवा ज्ञान नक्की मिळेल असे आवाहन करुन कार्यक्रमासाठी उपस्थित राहीलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुळ्ये आणि शिवराम जोशी यांनी केले.