बिबट्याच्या डरकाळीला घाबरून साडेचारशे कोंबड्या दगावल्या, लाखोंचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

आधीच कुक्कुटपालन व्यवसाय नुकसानीत गेला असताना पोल्ट्रीचालकांसमोर बिबट्याचे संकट उभे ठाकले आहे. बंदिस्त पोल्ट्रीफार्मवरबिबट्याने झडप मारत डरकाळ्या फोडल्याने सुमारे साडेचारशे कोंबड्या दगावल्याची घटना साक्री तालुक्यातील चिकसे येथे घडली आहे. या घटनेत पोल्ट्रीचालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

चिकसे येथे अविनाश पाटील यांचा पोल्ट्री फार्म आहे. सुमारे पाच हजार कोंबड्या या पोल्ट्रीफार्ममध्ये आहेत. रविवारी बिबट्याने पोल्ट्री फार्मवर झडप घातली. पण, जाळी तुटली नाही. त्यामुळे कोंबड्यांवर ताव मारण्याचा बिबट्याचा प्रयत्न फसला. पण, बिबट्याचा जाळीवर आक्रमक हल्ला आणि डरकाळ्यांमुळे कोंबड्यांच्या मनात भीती निर्माण झाली. अनेक कोंबड्यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे कोंबड्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि साडेचारशे कोंबड्या मरण पावल्या. हे सारे दृश्य अंबादास पाटील यांनी पोल्ट्रीफार्मवर बसविलेल्या सीसी टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. वनविभागाला हे चित्रीकरण सोपविण्यात आले असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. महामार्गालगतच्या राखीव क्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढली आहे. ही बाब वनविभागाच्या दृष्टीने चांगली असली तरीही शेतकर्‍यांना मात्र त्यामुळे नुकसानच सहन करावे लागत आहे.