नोकरी गेल्याने भीक मागणाऱ्या 450 हिंदुस्थानींना सौदी अरेबियात पकडले

कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. तसेच जगभरात बेरोजगारीची समस्याही वाढत आहे. त्यामुळे आखाती देशात काम करणाऱ्या अनेक हिंदुस्थानींच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. तर काहीजणांना आखाती देशातून हिंदुस्थानात परत पाठवण्यात आले आहे. सर्वात बिकट अवस्था सौदी अरेबियात काम करणाऱ्या हिंदुस्थानींची झाली आहे. सौदीताल सुमारे 450 हिंदुस्थानींच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यावर भीक मगण्याची वेळ आली. या भीक मागणाऱ्या हिंदुस्थानींना सौदीच्या प्रशासनाने पकडून त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांची रवानगी डिटेन्शन सेंटरमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे हे 450 हिंदुस्थानी मोठ्या संकटात सापडले आहेत.

अनेक हिंदुस्थानींच्या कामाचा परवाना संपल्याने त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आल्याचे सौदीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, नोकरी गेल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ आल्याचे या कामगारांनी सांगितले. तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्रातील कामगारांचा त्या 450 जणांमध्ये समावेश आहे. या कामगारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या बिकट असवस्थेची माहिती मिळाली आहे. या व्हिडीयोत कामगार हिंदुस्थानात परतण्यासाठी मदत मागत आहेत. परिस्थितीमुळे भीक मागत असताना सौदीच्या प्रशासनाने आम्हाला पकडले, आमची चौकशी केली. त्यानंतर ओखळ पटवून जेद्दाह येथील डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवले, असे हिंदुस्थानींनी सांगितले. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. परिस्थितीमुळे आमच्यासेमोर भीक मागण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नव्हता. मात्र, प्रशासनाने आमच्या कामाचा परवाना संपल्याचे सांगत डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवले आहे. या सेंटरमध्ये जगणे कठीण असल्याचे अनेक हिंदुस्थानींनी सांगितले.

पाकिस्तान, बांग्लादेश, इंडोनेशिया, श्रीलंका आणि इतर देशातील कामगारांना त्यांच्या देशाच्या अधिकाऱ्यांनी मदत केली. त्यामुळे ते त्यांच्या देशात परतले आहेत. आम्हालाही हिंदुस्थानात परतायचे असून आम्ही मदतीची वाट बघत आहोत, असे एका कामगाराने सांगितले. फक्त परिस्थितीमुळे आम्ही डिटेन्शन सेंटरमध्ये अडकल्याचे तो म्हणाला. आपल्या भावाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे आपल्याला हिंदुस्थानात परतायचे आहे, असे सांगत एका कामगाराने सरकारची मदत मागितली आहे. अमजद उल्ला खान या समाजसेवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी हवाई उड्डाणमंत्री हरदीप सिंह पुरी आणि सौदी अरेबियातील हिंदुस्थानचे राजदूत औसाफ सईद यांना पत्र लिहून अडकलेल्या हिंदुस्थानींची मदत करावी, अशी मागणी केली आहे. जेद्दाहमधील दूतावासाने अडकलेल्या हिंदुस्थानींची माहिती मागवली आहे. सुमारे 2.4 लाख हिंदुस्थानींनी परतण्यासाठी अर्ज दिले असून त्यापैकी आतापर्यंत फक्त 40 हजार कामगार मायदेशी परतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या