अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यात 475 कोटींचे नुकसान;16 हजार 226 हेक्टरवरील फळबागा भूईसपाट

444

ऐन उन्हाळ्यात नगर जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीतील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारीत जिल्ह्यात 3 लाख 65 हजार शेतातील उभी पिके उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात नुकत्याच पूर्ण झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात हा आकडा 4 लाख 54 हजार हेक्टरच्या पुढे गेला आहे. या पंचनाम्याचा आकडा 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचा असून झालेल्या नुकसानीचे मूल्य 475 कोटी 10 लाख 50 हजार रुपये असल्याचा अहवाल राज्य सरकारच्या कृषी विभागाने तयार केला आहे.

कृषी विभागाने पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या सहीने राज्याच्या कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला असून कृषी आयुक्त हा अहवाल सरकारला सादर करणार आहेत. या अहवालाची प्रत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख 91 हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती. शेवटच्या टप्प्यात पावसाने चांगलाच जोर धरला. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील पावसाने सरासरीची मर्यादा ओलांडली. हा काळ खरीप हंगामातील पिकांच्या काढणीचा होता. यावेळीच अवकाळी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 1 हजार 529 गावातील 3 लाख 84 हजार शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता.

1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पंचानाम्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात 4 लाख 54 हजार 12 हेक्टरवर नुकसान झाल्याची आकडेवारी संकलित झाली आहे. जिल्ह्यात 1 हजार 583 गावात 6 लाख 36 हजार 146 शेतकर्‍यांचे 4 लाख 54 हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने संकलीत केलेली आकडेवारी सरसकट नसून 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांची आहे. यात 2 लाख 16 हजार हेक्टरवरील जिरायत भागातील, 2 लाख 21 हजार हेक्टरवरील बागायत भागातील पिके आणि 16 हजार 226 हेक्टरवरील फळबागांचा समावेश आहे. जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील 170 गावांमध्ये सर्वाधिक तर श्रीरामपूरमधील 56 गावात सर्वात कमी नुकसान झाले आहे. सर्वाधिक बाधीत शेतकर्‍यांची संख्या पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 83 हजार 335 असून सर्वात कमी शेतकरी संख्या 11 हजार 124 जामखेड तालुक्यात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या