सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांची संख्या 48 वर; 290 अहवालांची प्रतीक्षा

454

सिंधुदुर्गात शनिवारी एकही तपासणी अहवाल आला नाही. कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या 290 नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. जिल्ह्यात 51 हजार 319 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या 12 कंटेंमेन्ट झोन जाहीर करण्यात आले असून त्याठिकाणी पोलीस तैनात आहेत. जिल्ह्यात एकूण 48 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबईला गेला असून 39 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 29 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण 18 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये वैभववाडी तालुक्यातील 2, कणकवली तालुक्यातील 12, सावंतवाडी तालुक्यातील 3 आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या 18 पॉझिटिव्ह अहवालांपैकी 9 अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. हे पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण कणकवली तालुक्यातील आहेत. त्यामध्ये वारगाव येथील 5, उंबर्डे बिडवाडी येथील 2, कासार्डे धुमाळवाडी 1, सडुरे तांबळघाटी 1 यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुब नगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, माडखोल, कुडाळ तालुक्यातील पणदूर, मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंटेन्मेंट झोन आहेत.

जिल्ह्यात एकूण 26 हजार 378 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 382 व्यक्ती शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 24 हजार 851 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रामध्ये 1 हजार 45 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 710 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 420 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 48 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 372 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 290 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 135 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 81 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 30 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये 24 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत शनिवारपर्यंत 6 हजार 647 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. परराज्यातून व राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 मेपासून आतापर्यंत एकूण 55 हजार 21 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या