कोरोनाशी लढून ठाण्यातील 353 पोलीस ऑन ड्यूटी, उपचारानंतर 49 ठणठणीत

716

ठाण्यातील 353 पोलिसांनी कोविडला चकवा देण्यात यश मिळवले आहे. कोरोनाची लागण झालेल्या 111 पैकी 49 पोलिसांनी कोविडवर मात केली आहे. तर हायरिस्कवरमधील 294 पोलिसांनी आपला क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असून आपण ठणठणीत असल्याचे सिद्ध केले आहे. हे सर्व पोलीस कर्मचारी कोरोनाची नाकाबंदी करण्यासाठी पुन्हा ऑन ड्यूटी सज्ज झाले आहेत.

कोरोनाला रोख्याण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन जारी झाल्यापासून पोलीस 24 तास ऑन ड्यूटी रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. मात्र ड्यूटी बजावत असताना  आतापर्यंत 14 अधिकार्‍यांसह 111 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात एका महिला पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. तर कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील हायरिस्कमधील 46 अधिकार्‍यांसह 248 कर्मचारी अशा 294 पोलिसांना क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे ठाणे पोलिसांमध्ये  आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण होते. पण आता परिस्थिती सुधारत असून मोठमोठया गुन्हेगारांना जेरबंद करण्यात माहिर असलेल्या ठाणे पालिसांनी कोरोनालाही हरवण्यात यश मिळवल्याचे दिसून आले आहे.

  • ठाणे पोलीस मुख्यालयात एका अधिकार्‍यांसह 103 पोलीस ड्यूटीवर पुन्हा रुजू झाले आहेत.
  • मुंब्रा पोलीस ठाण्यातील 17 अधिकार्‍यांसह 69 पोलिसांनी आपला क्वारंटाईनचा वनवास संपवला आहे.
  • वर्तकनगरमधील तीन अधिकार्‍यांसह 30 कर्मचारी तर वाहतूक शाखेचे 21 पोलिसांनी क्वारंटाईन संपवून कामावर हजर झाले आहेत.

61 पोलिसांवर उपचार सुरू
ठाण्यात आतापर्यंत 14 पोलीस अधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 7 अधिकारी पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 97 कर्मचार्‍यांपैकी 42 जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित सात अधिकार्‍यांसह 54 कर्मचार्‍यांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून लवकरच ते ही लढाई जिंकून ड्यूटीवर हजर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

294 पोलीस पुन्हा ड्युटीवर रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेकांनी कोरोनावर मात केल्यामुळे पोलिसांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.

कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलीस मुख्यालयासह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचारी हे बाधित झाले. या कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील अनेक पोलिसांना घरात तसेच केंद्रांत विलगीकरणामध्ये राहावे लागले. त्यामुळे त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती मिळाली होती. यातील बहुतांश जणांचा 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे हे सर्वजण आता पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.

असे आहे संख्याबळ

ठाणे पोलीस मुख्यालयात एका अधिकार्‍यांसह 103, मुंब्रा पोलीस ठाण्यात 17 अधिकार्‍यांसह 69, वर्तकनगर तीन अधिकार्‍यांसह 30 कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे 21 असे आतापर्यंत 294 पोलीस रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आतापर्यंत 14 अधिकारी आणि 97 कर्मचारी अशा 111 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यात एका महिला कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

सात अधिकारी आणि 42 कर्मचारी अशा 49 पोलिसांनी कोरोनावर मात केली. सध्या सात अधिकारी आणि

54 कर्मचारी अशा 61 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

पोलीस मुख्यालयात सर्वाधिक 22 त्यापाठोपाठ मुंब्रा 15 तर कळव्यात 12 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. राज्य राखीव दलासह शीघ्र कृतीदलही कळवा, मुंब्रा आणि वागळे इस्टेट भागात तैनात केल्याने पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे

आपली प्रतिक्रिया द्या